महाराष्ट्रभरात सध्या राजकारणाचे फड रंगताना दिसत आहे तर गल्लीबोळांत प्रचाराचा धुराळा उडत आहे. आपण राजकीय क्षेत्रातील काही जाणकारांशी आणि मतदारांशी बोलून या सर्व गोष्टींचा आढावा घेत आहोत. वयाने जरी ८३-८४ गाठली तरी मनाने तरुण असलेले राष्ट्रवादीचे द्रष्टे नेते शरद पवार साहेब सध्या जबरदस्त फॉर्मात असल्याचे दिसत आहे. त्यांनी त्यांच्या भात्यातील सर्व राजकीय अस्त्रे बाहेर काढली आहेत. महाराष्ट्राचा आणि पवार साहेबांची राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राहुल गांधी यांच्या काँग्रेसचा विचार केल्यास लोकसभे प्रमाणेच यावेळी म्हणजे विधानसभेसाठी सुद्धा एक नंबरचा पक्ष म्हणून काँग्रेस पुढे येईल. मात्र, त्याला शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी टक्कर देऊ शकतो. आणि तीन नंबरला उद्धवसेना येईल. पवार साहेब अत्यंत मुरब्बी राजकारणी तर आहेतच पण त्यांना राजकारणातील भीष्माचार्य म्हटल्यास ते वावगे ठरू नये. जर यांच्याकडे सत्ता आली तर केवळ मुख्यमंत्री पदासाठी भांडण करून हातची सत्ता सोडण्या इतके शरद पवार साहेब वेडे नाहीत. उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक असले तरी त्यांना ते मिळेल असे मुळीच वाटत नाही. कारण त्यांना एकदा संधी दिली गेली होती आणि ती संधी कारणे काही का असेनात पण त्यांनी दवडली हे जगजाहीर आहे. पवार साहेब म्हटले की ज्याचे जास्त आमदार निवडून येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल. आणि हेच योग्य ठरेल.
दुसरीकडे भाजपने पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि योगी यांच्या सारखे मोहरे मैदानात प्रचारासाठी उतरविले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या सारखा डोकेबाज माणूस सुद्धा मैदानात आहेच. कुणी कितीही नाकारा अथवा उद्धव साहेबांशी गद्दारी केली म्हणा. पण, एकनाथ शिंदे यांना दुर्लक्षून चालणारच नाही. ते सध्या भाजपच्या वरच्या वर्तुळात अत्यंत फॉर्मात आहेत. सत्ताधारी ४० आमदारांनी कित्येक नगरसेवक, जिल्हाप्रमुख, शाखाप्रमुखांनी यांच्यावर विश्वास ठेवून यांना साथ दिली आणि टीका, टोमणे सहन करीत या व्यक्तीने दोन अडिचवर्ष मुख्यमंत्रीपद मस्तपैकी सांभाळले हे आपण नाकारू शकतच नाही.
राजकारणात कुणीच कुणाचा कायम शत्रू अथवा मित्र असत नाही. आणि हे खरे आहे. सत्तेसाठी निवडणुकी नंतर सुद्धा कितीतरी युत्या आणि आघाड्या होऊ शकतात. भाजपा, शिंदे सेना आणि आणि अजित पवारांची राष्ट्रवादी जर निवडून आली तर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच होईल. पण दगडा पेक्षा वीट मऊ असे समजून भाजप एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करून फडणवीसांना केंद्रात मोठे पद देण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण या सर्व सुंदोपसुंदीत अजित पवारांची मात्र जबरदस्त पडझड होणार आहे. मोठ्या पवारांना सोडून भाजपात येण्याचा त्यांचा निर्णय त्यांच्या अंगलट येण्याची जास्त शक्यता आहे. आणि मग यात त्यांचे राजकारण पुन्हा शून्यावर येईल.
बाकी इतर पक्षांनी त्यांचे उमेदवार जरी नगास नग म्हणून मते खायला उभे केलेले असले तरी ते बोटावर मोजण्याइतकेही निवडून येणार नाहीत हे सांगायला कुण्या ज्योतिषाची गरज नाही.. अगदी स्पष्टच सांगायचे तर यावेळी शरद पवार साहेब त्यांचे सगळेच फासे फेकून त्यांच्या विरोधकांच्या तोंडाला फेस आणतील हे मात्र निश्चित आहे.
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग..
Shabda Khadag © 2024. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.