ती मनस्वी आहे.. कुणाच्या अध्यात मध्यात नाही.. प्रामाणिक आहे.. सर्वात महत्वाचं म्हणजे गाणं तिचा श्वास आहे. मी हे बोलतोय ते नाशिक येथील सुप्रसिद्ध गायिका.. भारतीय जनता पार्टीच्या चित्रपट कामगार आघाडीची सचिव.. आणि बऱ्याच संस्था संघटनांमध्ये विविध पदांवर समाजसेवा करणारी माझी जिवलग मैत्रीण सौ. रेखा निकुंभ हिच्या बद्दल. आज तिच्या एकूणच प्रगतीचा आणि मेहनतीचा आलेख मांडण्याची गरज यासाठी वाटली की खुपशा लोकांना ते फार बिझी आहेत या सबबीखाली स्वःताचा छंद मारतांना मी पहिले आहे. रेखाचं स्ट्रगल पाहिल्यावर मेहनत काय असते आणि आवड असली की सवड कशी काढता येते याचे मार्गदर्शन मिळेल. आणि म्हणूनच हा शब्द प्रपंच करीत आहे. रेखाचं गाणं फुलवलं ते खऱ्या अर्थाने रेडिओ ने.. तेव्हा आकाशवाणी, सिलोन, विविधभारती अशा अनेक ठिकाणांहून गाणी लावली जायची. खरं तर तेव्हा घरात रेडिओ असणं ही देखील चंगळ समजली जायची. तिने पहिलं गाणं ती चवथी मध्ये असतांना शाळेत गायलं होतं. तेव्हा ती चाळीसगाव जळगाव या विभागात राहत होती.. तिची गाण्यातली प्रगती पाहून तिच्या शिक्षकांनी तिला प्रोत्साहन दिले आणि मग तिने मागे वळून न पाहता शाळेसाठी गाण्यात अनेक बक्षिसे पटकावली. बरं ती अभ्यासात सुद्धा हुशार होती बरे.. पहिल्या तीनात यायचीच.. लग्न झाल्यावर ती नाशिकला आली. तिचे मिस्टर डॉक्टर मात्र स्वभावाने अत्यंत कडक. मग गाणं थोडं मागे पडलं. पण, तिने जिद्द न सोडता तिच्या मिस्टरांना गाणं गाऊ द्या म्हणून राजी केलं. त्यांनी परवानगी दिली पण, अंध शिक्षकांच्या ग्रुप मध्ये गायला. मात्र रेखा अजिबात हिंमत हरली नाही तिने जवळ पास तीन साडे तीन वर्ष या अंध सरांच्या ग्रुप बरोबर गाणी गायली. शेवटी ती वेळ आलीच जेव्हा ती गाण्यांच्या मुख्य प्रवाहात आली. आवाज चांगला असल्याने आणि अनुभव असल्याने तिला विविध ग्रुप गाण्यासाठी बोलवू लागले. तिचा स्वतःचाही 'आरएन धून ' नावाचा ऑर्केस्ट्रा ग्रुप आहे. ती आजही तिची सगळी कौटुंबिक जबाबदारी पार पाडून तिचा छंद जोपासत आहे. शोला, मीटिंगला, समाजसेवेच्या काही कामांना बाहेर जायचं असेल तर ती लवकर उठून सगळा स्वयंपाक करूनच घरा बाहेर पडते. म्हणजेच वेळेचं नियोजन करून ती तिचा छंद जोपासत आहे आणि हाच छंद आज तिला कार्यक्रमांतून मानधन सुद्धा मिळवून देत आहे.
मी तिला प्रॉमिस केलेलं जेव्हा मी लेखक - दिग्दर्शक म्हणून काही करेल तेव्हा तुला नक्की गाणं देईल आणि मी म्हटल्या प्रमाणे माझ्या ' फिर वही रात..' सिनेमासाठी तिला ' मेरे सनम मेरे हमदम साथ निभाना जनम जनम..' हे गाणं दिलं आणि ते तिने उत्कृष्ठ गायलं.. याच सिनेमात तिच्या मुलीला म्हणजे डॉ. नेहाला सुद्धा ' सुनो पिया मेरे दिल में तेरी याद धडकती है..' हे गाणं दिलं. आता लवकरच हा चित्रपट आपल्याला ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळेल. नंतर मी गीत संगीत दिलेल्या ' घुसमट ' या अल्बमसाठी रेखाने ' माझ्यात उगवून मी रे रोज मला भेटते रे वाट अनोळखी ही माझ्यात मिटते रे..' हे अप्रतिम गाणं गायलं.. यांचं दरम्यान मी लिहिलेलं ' डोंगरची मैना..' या अल्बम मधलं ' घाटा घाटात साखर पेरली मोट ज्वानीची हाती ही धरली तुम्हासाठी मी रातभर झुरली हो राया तुम्ही डोंगरची मैना ही हेरली..' ही अप्रतिम ठसकेबाज लावणी रेखाने तिच्या खड्या आवाजात गायली.. नंतर माझंच गीत संगीत असलेलं.. ' फिर उसी गली में शाम लेके आयी, 'तेरी याद उभरके सामने आयी..' हे अप्रतिम गाणं तिने गायलं. सध्याही आमचे अनेक प्रोजेक्ट येऊ घातले आहेत. डोंबिवलीत शब्द खड्गची पहिली ४० / ५० प्लस कराओके गायन स्पर्धा रेखाच्याच पुढाकाराने झाली. नंतर अनेक गायन स्पर्धा, कराओके शो, हळदीकुंकू, महिलांसाठी फॅशन शो असे अनेक सातत्यपूर्ण कार्यक्रम होत राहिले जे आजही होत आहेत. रेखा गेली २५/३० वर्ष स्टेजवर अव्याहतपणे गात आहे. परीक्षक म्हणून जात आहे. तिच्या घरी अनेक महिलांना कराओके गायनाचे धडे देत आहे. गाणं तिचा श्वास आहे आणि गाण्याशिवाय ती जगूच शकत नाही म्हणून ती वेळेचे योग्य नियोजन करून गाण्याचा छंद जपते. तिच्या वडिलांना अभिनेत्री रेखा खूप आवडायची म्हणून त्यांनी त्यांच्या या घरातील पहिल्या अपत्याचे नांव रेखा ठेवले. म्हणून मी रेखा से रेखा तक चा धगधगता प्रवास असे नांव दिले आहे. येत्या काळात शब्द खड्ग ' रेखा स्पेशल..' कार्यक्रम करणार आहे. वैयक्तिक माझ्या तर्फे आणि आपल्या शब्द खड्ग परिवारातर्फे रेखाच्या संगीत कारकीर्दीस आभाळभर हार्दिक शुभेछया.. उत्तरोत्तर तिची अशीच प्रगती होत राहो ही प्रार्थना..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.