श्रीमती. समाप्ती अरुण जगताप अर्थात एका जिद्दी आईची लक्षवेधी कथा..
आपल्या मुलासाठी कडीकपार उतरून खाली आलेली हिरा गवळण हिरकणी म्हणून प्रसिद्ध पावली. आपल्याकडे अशा कितीतरी माता भगिनी अशा आहेत की ज्या अत्यंत प्रामाणिकपणे आणि कष्टाने आपल्या मुलांचे, कुटुंबियांचे संगोपन करीत आहे. अगदी अशीच एक हिरकणी डोंबिवली पश्चिमेच्या भागशाळा मैदानाजवळ असलेल्या मिहीर पेट्रोलपंपावर आपल्या अडीच वर्षाच्या ध्रुव नावाच्या मुलाला कडेवर घेऊन पेट्रोल भरण्याचे काम करीत आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात आणि अगदी विटा, रस्ते बनविण्याच्या कामांत सुद्धा अनेक महिला मुलांना सोबत घेऊन काम करीत असतात. पण, खूपदा ही मुले एखाद्या झाडाखालच्या झोळीत असतात नाहीतर कुणाच्यातरी आसऱ्याने असतात. पण, इथे ध्रुव हा छोटा मुलगा खूपदा त्याची आई समाप्तीच्या कडेवर असतो. पेट्रोल भरायला आलेल्या लोकांना याचे खूप अप्रूप वाटते. मात्र, पेट्रो डिझेल हे इंधन आहे आणि इथे अपघात घडण्याची शक्यता असते म्हणून या छोट्या मुलाला इथे सोबत घेऊन काम करू नये असे सुद्धा काही लोक म्हणतात. मात्र, समाप्तीची मजबुरी असल्याने कारण तिच्या मिस्टरांचे निधन झालेले असल्याने तिला मुलाला इथे सोबत घेऊन यावे लागते. इथले इतर कामगार या मुलाला खूप जीव लावतात.
समाप्ती यापूर्वी गल्फ कंट्री कतार येथे आलिया फे या कंपनीत चार ते पाच वर्ष कामाला होती. त्यानंतर ती भारतात आली आणि लोणावळ्याच्या रेडिसन हॉटेलात वेलकम गर्ल म्हणून तिने दोन वर्ष काम केले. मात्र तिच्या लिव्हरला सतत सूज येत असल्याने तिची प्रकृती खालावली आणि मग तो जॉब तिला सोडावा लागला. आता जवळ पास दोन वर्ष ती मिहीर पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याचे काम करीत आहे. या पेट्रोलपंपाचे मालक श्री. विलास म्हात्रे आणि त्यांचे पार्टनर श्री. अभिजित शेळके हे स्वभावाने खूप चांगले आहेत व त्यांनी मोठ्या मनाने समाप्तीला मुलाला सोबत घेऊन काम करण्याची परवानगी दिलेली असल्याने ती त्यांचे खूप आभार मानते. डोंबिवली पश्चिमेच्या गोपीनाथ चौकात समाप्ती भाड्याच्या चाळीत राहते. तिला वैष्णवी नावाची चौदा वर्षांची एक मुलगी सुद्धा आहे ती सरस्वती विद्यालयात शिक्षण घेत आहे. मुलांचे संगोपन, शिक्षण, कपडे, डॉक्टर, स्वतःचा खर्च, जेवण खाण, लाईट बिल , घर भाडे असे सर्व तिला एकटीला बघावे लागते. समाप्तीला सिझनल व्यवसाय करायला खूप आवडते. म्हणजे उन्हाळ्यात कलिंगड, आंबे विकणे इत्यादी. मात्र, त्यासाठी खूप पैसे लागतात असेही ती सांगते. आपल्याला कुणी फुकट बसून जेवायला घालणार नाही याची मेहनती समाप्तीला पूर्ण जाणीव असल्याने ती मेहनत करीत आहे. पेट्रोलपंपावर येणारे काही ग्राहक चांगले असतात तर काही ग्राहक वाईट असतात असे ती सांगते. पण काम आहे आणि ते करायचेच आहे. चांगल्याशी चांगलं आणि वाईटाशी वाईट असा समाप्तीचा स्वभाव आहे. विशेष म्हणजे समाप्तीला जुनी हिंदी, मराठी गाणी गाण्याची आणि अभिनयाची सुद्धा खूप आवड असल्याचे तिने शब्द खड्गला सांगितले. पेट्रोलपंपाचे मालक चांगले आहेत म्हणून मला हे काम करणे शक्य आहे असे ती सांगते. पण, तिला स्वतःच्या हिमतीने काहीतरी वेगळे आणि भव्य दिव्य करायचे आहे हेही तिच्या बोलण्यातून सतत जाणवत राहते. इतरत्र अव्वाच्या सव्वा पैसे उडविणाऱ्या लोकांनी अशा मेहनती लोकांच्या मुलांच्या आरोग्य आणि शिक्षणासाठी तथा व्यवसायासाठी आर्थिक मदत केली तर या पेक्षा मोठे पुण्य नाही. आणि म्हणूनच समाप्ती तथा तिच्या सारख्या इतर अनेक मेहनती, प्रामाणिक माता भगिनींच्या मेहनतीला सुहृदयी लोक नेहमीच सलाम करतात.. समाप्तीला कोकणात राहणारी तिची आई तारामती हरिश्चंद्र सावंत आणि माहेरची मंडळी अगदी सावली सारखी साथ देत आहे आणि मदत करीत आहे.. केवळ आणि केवळ तिच्या पडत्या काळात तिच्या माहेरचेच तिच्या पाठी खंबीरपणे आजतागायत उभे आहेत. तिच्या मुलाचं नाव तिने ध्रुव समाप्ती सावंत असे ठेऊन खऱ्या अर्थाने ती कणखर माता असल्याचे तिने सिद्ध केले आहे..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.