कार्ल मार्क्स यांनी धर्माला अफूची गोळी म्हटलेलं. दुर्दैवाने आपल्या भारतात या अफूच्या गोळीची गुंगी अजूनही उतरलेली नाही..
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केलेल्या एका वक्तव्यामुळे मोठा राजकीय वादंग उठला आहे. त्यांच्या वक्तव्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. योगी आदित्यनाथ यांनी प्रचारादरम्यान ‘बटेंगे तो कटेंगे’ अशी घोषणा देत जनतेला सावधानतेचा इशारा दिला होता. त्यानंतर आदित्यनाथ यांच्यावर टीका सुरू झाली. महाराष्ट्र्राची २०२४ ची विधानसभा निवडणूक आणखी काय काय रंग दाखवेल हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे..
मात्र भाजपा नेत्यांनी व शिवसेनेच्या (शिंदे) नेत्यांनी देखील योगींचा हा नारा उचलून धरला आहे. तर, महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने मात्र स्पष्ट केलं आहे ते या घोषणेशी सहमत नाहीत. त्यापाठोपाठ भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील अशा घोषणेची आवश्यकता नसल्याचं नमूद केलं. दुसऱ्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक हैं तो सेफ हैं’असा नारा दिला. मात्र, या दोन घोषणांमुळे महायुतीत जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. जग झपाट्याने विस्तारत असतांना तुम्ही समाजा समाजात जातीयतेची तेढ निर्माण करून पुन्हा पेशवाई आणीत अहात. कोण तुम्हाला काटणार आहे हे तरी एकदाचे सांगून टाका. माणूस माणसाच्या मदतीला येतो आणि प्रामाणिक मदत करणारे तुमची जात, धर्म पाहून मदत करीत नाही. आपली जात एकच ती म्हणजे माणुसकी आणि आपला धर्म म्हणजे मानवता. पण, योगी सारखे नेते उगीचच काहीबाही बोलून वातावरण बिघडवून ठेवण्यास कारणीभूत ठरतात आणि याला आम्हीतरी मुळीच विद्वत्ता म्हणत नाही. आणि या गोष्टीला देवेंद्र फडणवीस उचलून धरतात ही सुद्धा शोकांतिकाच आहे. याने यांना बहुजन आणि मुस्लिम समाज मते देईल काय..??
‘बटेंगे तो कटेंगे’ याचा छुपा अर्थ असा की भारतात फक्त तुम्हीच रहायचे आणि बाकीच्यांनी मग कुठे जायचे असा जर कुणी काढला तर त्यात दोष कुणाचा..?? देशात लोकशाही आणि घटनेचे राज्य आहे याची तुम्हाला जाण असायलाच हवी. हुकूमशाही कायम टिकत नाही हे सांगायला कुण्या ज्योतिषाची गरज नाही.
देशाला आणि देशातील सर्वसामान्य जनतेला अन्न, वस्त्र, निवारा, चांगले आरोग्य, शिक्षण, रोजगार, वीज, पाणी , वाहतुकीच्या चांगल्या सुविधा पुरविण्यावर लक्ष केंद्रित करण्या ऐवजी 'बटेंगे तो कटेंगे' असे म्हणणे म्हणजे छुपी जातीयता पसरविणे असे वाटते. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा ‘एक हैं तो सेफ हैं’ म्हटले आहे. अरे केंद्रात तुमचे सरकार आहे आणि तुम्ही ईडी सारखा बागुलबुवा उभा केला होता हे सर्वांना ठाऊक आहे. मग तुम्हाला कुणाची आणि का भीती वाटते.?? तुम्ही समानतेचा, लोकशाहीचा आणि मानवतेचा विचार करणाऱ्या लोकांना घाबरता का.?? हे सगळं फार गंभीर आहे. सावधान.. 'म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतोय..' बाकी जनता सुज्ञ आहेच........
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2024. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.