एकदा निघून गेलेली वेळ पुन्हा येत नाही हे म्हणतात ते काही खोटे नाही. खूपदा आपण एखाद्यावर नाराज होतो कारण आपल्या मेसेजला समोरचा लवकर प्रतिसाद देत नाही. पण, खूपदा हा समोरचा त्याच्या कामात खूप व्यस्त असल्याने त्याला त्या वेळी आपल्याला प्रतिसाद देता येत नाही.. कधी कधी या समोरच्याची बायको अथवा नवरा किंवा घरातले आई, वडील, बहीण, भाऊ प्रचंड संशयखोर असल्याने त्याला किंवा तिला तुमच्या मेसेजला प्रतिसाद देता येत नाही. अशा वेळी आपण समोरच्याला समजून घेणे गरजेचे असते.
चांगली वाईट वेळ प्रत्येकाचीच येते.. वेळ वाळू सारखी हातातून निसटून जाणारी असल्याने तिचा सदुपयोग करणे गरजेचे आहे. कुणाही आलतू फालतू साठी आपल्या हातातील बहुमूल्य वेळ न दवडता जो तुमच्या जीवाला जीव देतोय त्याच्या साठीच वेळ काढा असे माझे स्पष्ट मत आहे.
कधी कधी आपल्याला एखाद्याची खूप गरज असते पण तो एखादा ऑनलाईन दिसत असूनही आपल्याला वेळ देत नाही आणि त्याच वेळी तो इतरांशी मात्र बोलत असतो म्हणजेच तो दहा दगडांवर पाय ठेवणारा अथवा ठेवणारी असेल तर अशा लोकांशी संबंध ठेवण्यात काहीच हशील नसते कारण या व्यक्ती किमान तुमच्याशी तरी अजिबात प्रामाणिक नसतात. या व्यक्ती स्वार्थी आणि गरजेपुरत्या असतात..
कधीकधी आपल्याला समोरच्याशी खूप बोलावेसे वाटते पण तो बिझी असतो किंवा आराम करीत असतो किंवा त्याचा तुमच्याशी त्यावेळी बोलण्याचा मूड नसतो. मग ही मूड नसलेली व्यक्ती त्याचा मूड आल्यावर त्याच्या सवडीने तुमच्याशी बोलू पाहते अथवा पाहतो. माझ्या मित्र मैत्रिणींनो ही अशी माणसेही तुमच्या काहीच फायद्याची नसतात बरे. या जगात एक मिनिटही बोलू शकणार नाही इतकं कधीच आणि कुणीच बिझी नसतं.. तुमच्याशी बोलण्याची जर समोरच्याला खरंच आंतरिक इच्छा असेल ना तर ती व्यक्ती कसाही तुमच्यासाठी वेळ काढतेच.. माझ्यासाठी कोण कसा आणि किती वेळ काढतो या गोष्टीची मी सतत माझ्या डोक्यात नोंद ठेवीत असतो. काही मंडळी तर आपल्याला गृहीत धरून ऑनलाईन असतानाही रिप्लाय द्यायला अर्धा अर्धा तास लावतात. या अशा मंडळींवर कधीच विश्वास ठेवू नका. आणि काही मंडळी तर आपल्याला इतकं गृहीत धरतात की आपण त्यांना मेसेज केला तरच ते मेहेरबानी करीत आहोत या अविर्भावात आपल्याला मेसेज करतात. म्हणजे हे बिझी आणि आपण रिकामटेकडे.. मी कितीही बिझी असलो तरी अर्थात मी बिझी असतोच रोज भरपूर बातम्या टाईप करायच्या असतात. पण, तरी ही मी माझ्या चांगल्या संबंधातील माणसांना बातम्या टाईप करता करताही मेसेज करून कसे अहात, काय चाललंय हे विचारतोच..
आपण वेळात वेळ काढून आपल्या माणसाला दोन शब्द प्रेमाचे विचारल्याने त्याची विचारपूस केल्याने समोरच्यालाही मनातून बरे वाटते. संवाद दोन्ही बाजूने होत असेल तरच ते नाते टिकते. तुम्ही कामात असाल तेव्हा ठीक आहे हो. पण, तुम्ही प्रत्येकवेळी समोरचा मला मेसेज करील तेव्हाच मी त्याच्याशी बोलेल असे न करता कधीतरी स्वतःही त्या समोरच्या माणसासाठी वेळ काढा हो.
माझं म्हणाल तर मी समोरच्याला खूप संधी देतो कारण मला नातं टिकवायचं असतं. पण, समोरच्या व्यक्तीनेही याचा विचार करणे गरजेचे असते. बरोबर ना..?? आपल्या माणसासाठी कधीतरी लहान बापाचे व्हा हो.. काही फरक पडत नाही. वारंवार त्याच चुका करणाऱ्या कितीतरी घमेंडखोरांना त्यांच्या डोक्यात हवा गेली असल्याने मी माझ्या आयुष्यातून कायमचे वजा केले आहे.
आयुष्य, वेळ, परिस्थिती, पैसे, सौन्दर्य हे कधीच चिरकाल टिकत नाही.. म्हणून माणसं आणि त्या माणसांची वेळ आणि मने जपायला शिका हो. नाहीतर वेळ निघून गेल्यावर तम्ही समोरच्याला वेळ काढणार असाल तर, बैल गेला आणि सोफा केला असेच म्हणावे लागेल.. कळतंय ना मी काय बोलतोय ते.. ??
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग..
Shabda Khadag © 2024. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.