छडी लागे छमछम विद्या येई घम घम छम छम छम.. श्यामच्या आई या प्रल्हाद केशव अत्रे यांच्या राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेत्या सिनेमात छोट्या श्यामच्या तोंडी म्हणजे तेव्हाचे बाल कलाकार माधव वझे यांच्या तोंडी हे गाणे दिले आहे. यात श्यामची आई झालेल्या वनमाला बाई स्वतः शिक्षिका होत्या.. आज हे सांगण्याचा उद्देश हा आहे की, आज शिक्षकांना अपवाद वगळता अजिबात मान मिळतांना दिसत नाही. शिक्षकांवर समाजाची, पालकांची, शिक्षण खाते, शिक्षण संस्थेची आणि कायद्याची इतकी बंधनं आहेत की अक्षरशः काम कसे करावे हे त्यांना कळत नाही. शिक्षक काही विद्यार्थ्यांचे दुश्मन नाहीत. विद्यार्थ्यांचे भले व्हावे व विद्यार्थी समाजात पुढे जावा. त्याने देशाचे व आई वडिलांचे नांव काढावे असे शिक्षकांना वाटते. आजचे काही अपवादात्मक पालक वगळता बहुतांश पालक त्यांच्या मुलांना शिक्षकांनी छडी मारली तरी भांडायला येतात., पोलीस केस करतात, शाळेच्या मॅनेजमेंटकडे शिक्षकांची तक्रार करतात. याचा गैरफायदा मुले घेतात व ही मुले वांड होतात आणि शिक्षकांना चिडविणे, धमकी देणे, शिवीगाळ करणे, धक्काबुक्की करणे इत्यादी कृत्य करतात. आजही नव्वद टक्के शिक्षक मुलांच्या भल्याचा विचार करतात. काही शिक्षक स्वतःच्या पगारातून मुलांच्या फी भरतात. मात्र काही पोटार्थी शिक्षक मुलांना एक्स्ट्रा क्लास लावून पैसे उकळतात, काही शिक्षक मुलांबरोबर वाईट वर्तन सुद्धा करतात. पण, हे सर्व बोटावर मोजण्या इतके प्रकार निदर्शनास येतात. शिक्षक हा अतिशय नोबल आणि आदराचा जॉब आहे. कुणालाही शिक्षक होणे जमत नाही. त्यासाठी झोकून द्यावे लागते. हल्ली बहुतांश पालकांना एकच मूल असल्याने या मुलाला शिक्षकांनी मारलेलं अशा पालकांना सहन होत नाही.
पण, अगदी स्पष्टपणे बोलायचे तर मुलांना शिक्षकांची आदरयुक्त भीती वाटायलाच हवी. आजही आम्हाला आमचे शिक्षक भेटले की आम्ही खाली वाकून त्यांच्या पाय पडतो. हे आपले संस्कार आहेत. आणि आमचे शिक्षक सुद्धा खूप चांगले होते. आज असे शिक्षक अभावानेच आढळतात. पण, आजही चांगले प्रेमळ, समंजस शिक्षक आहेत. शिक्षकांवर सरकार जो अतिरिक्त कामाचा भार टाकते म्हणजे जनगणना, निवडणुकीची कामे इत्यादी इत्यादी.. ती कामे सरकारने बेरोजगारांना द्यावीत. शिक्षक मोकळा असेल तर त्याला मुलांसाठी खूप काही करता येईल. पण, दुर्दैवाने असे होत नाही. मी ज्या वेळी हायस्कुल मध्ये शिकवीत होतो त्यावेळी एका शिक्षकाने एका स्थानिक गाववाल्या विद्यार्थ्याला एक छडी मारली तर त्या मुलाचे पालक इतके चिडले की त्या शिक्षकाला मारायला अक्षरशः बंदूक घेऊन आले होते. आम्ही कशीतरी त्या पालकाची समजूत घातली होती. म्हणून असे म्हणावेसे वाटते की शिक्षकांना छडी मारण्याचा अधिकार हवाच. पण, ती छडी विद्यार्थी जखमी होईल अथवा त्याच्या मनात शाळे बद्दल आणि शिक्षकांबद्दल भीती बसेल अशी नसावी. दरारा असावा पण तो आदरयुक्त असावा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे काही अपवाद वगळता पालकांनी सुद्धा शिक्षकांवर विश्वास ठेवायला हवा..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.