आपल्या कामाप्रती प्रामाणिक असणे वाईट नाही. मात्र समोरचा त्याची गरज काढून घेतोय हे कळायला हवे. काही मंडळी स्वतःला मान मिळावा अथवा मोठेपण मिळावे म्हणून अतिरिक्त काम अंगावर ओढून घेतात. स्वाभिमान गहाण टाकलेली काही मंडळी चापलुसी करून सतत स्वतः प्रकाशात राहण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येकच मालक वाईट असतो असं आमचं मुळीच म्हणणं नाही. टाटांसारखे दिलदार उद्योगपती या देशानेच नाही तर अवघ्या जगाने सुद्धा पहिले आहेत. आम्ही मुद्दाम इथे पूर्वापार आपल्या जुन्या जाणत्यांनी म्हणून ठेवलेल्या म्हणीचा वापर केला आहे. चाकराने घोड्याला कितीही जीव लावला अथवा घोड्याची मिजास मिरविली तरी शेवटी पाटील चाकराला घोड्यावर बसू देत नाही. चाकराला घोड्याची लिदच काढावी लागते. पाटील चाकराला लोकांमध्ये गोड बोलला तरी तू चाकर आहेस अशीच नेहमी जाणीव करून देत असतो. म्हणून चाकराने बेगानी शादीत अबुल्लाह ने दिवाने बनू नये हे कायम लक्षात ठेवावे. होतं काय एकाला कुरवाळीत बसण्याच्या नादात काही मंडळी त्यांच्यावर जीव लावणारे, त्यांच्याशी हक्काने भांडणारे, रुसणारे तरी वेळेला पाठीशी उभे राहणारे जिवाभावाचे मित्र दूर लोटतात.. मित्र अंगठाछाप का असेना पण मित्र हा नेहमी मित्रच असतो.
मागे एक किस्सा वाचनात आलेला.. एका श्रीमंत बाईच्या मुलीचं लग्न होतं. तिच्या घरी काम करणाऱ्या मोलकरीण बाईने आपल्या मालकिणीला शोभावी अशी साडी देण्याचे ठरविले. तिने मालकिणीच्या साडीसाठी इतरांकडून पैसे घेतले व मालकिणीला चांगली साडी प्रेझेंट दिली. मात्र, मालकिणीने मोलकरणीला साडी देतांना हि काय मोलकरीण आहे असे समजून लॉट मध्ये घेतलेली शे-दीडशे रुपयांची साडी दिली. सगळ्याच मालकिणी अशा नसतात हेही मान्य केले तरी बहुतांश आपण मालकीण असल्याच्या तोऱ्यातच वावरत असतात. तात्पर्य काय तर इतके दिवस त्या श्रीमंत बाईकडे इमाने इतबारे काम करणाऱ्या मोलकरणीला क्षणार्धात तू शेवटी आमची मोलकरीण आहेस याची जाणीव करून दिली गेली. म्हणून पळत्याच्या पाठी न लागता कामाशी काम ठेवून आपल्या माणसांची मनं धरायला शिका..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.