आयुष्यात सुख जवा एवढं आणि दुःख पर्वता एवढं असतं.. सुख दुःख हा ऊन सावलीचा खेळ असतो. म्हणून सतत दुःख कुरवाळीत बसण्यात काही अर्थ नसतो..
सतत तेच तेच दुःख आपल्या डोक्यात आपण ठेवलं तर मग जगण्यासाठी इतर गोष्टी करण्यात, छंद आणि आपल्या आवडी जोपासण्यात आपलं मन रमणार नाही, धजावणार नाही.. म्हणून आयुष्य जसं चांगलं वाईट समोर येईल तसं त्याला भिडायला शिका आणि कितीही समस्या आल्या तरी जास्तीत जास्त हसत राहण्याचा प्रयत्न करा. रडून कुठलीच समस्या कधीच सुटत नाही. हसल्याने आपल्याला विधायक एनर्जी मिळते. मन खुश तर सगळं खुश. माझं सगळं चांगलं होणार आहे आणि मी त्यासाठी प्रयत्न करतो आहे असं आपल्या मनाला सतत बजावीत रहा. आपण बोलतो तसं होतं बरे. तुम्ही जर नकारात्मक बोलत राहिलात तर आयुष्यात नकारात्मक गोष्टीच घडत जातात. आपल्या सभोवताली सतत रडणारी, नकारात्मक बोलणारी, आपले पाय खेचणारी मंडळी असतील तर त्यांच्या पासून सावध रहा, दूर राहा कारण ही मंडळी तुमचे विचार आणि तुम्हाला नकारात्मक बनविते. सतत सकारात्मक बोलणाऱ्या आणि तुम्हाला प्रोत्साहन देणाऱ्या लोकांच्याच संपर्कात रहा. हसल्याने चेहरा आणि मेंदूच्या नसा उघडतात आणि हृदय आनंदी राहते.. या जगात सगळीकडे दुःख आहे हा विचार करतांना दुःखाचे मूळ नष्ट करण्याच्या तथागताने सांगितलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करा. जास्त अपेक्षा ठेवल्या नाहीत तर दुःख होण्याचे कारणच समूळ नष्ट होईल. आपण ही हसा आणि आपल्या संपर्कात येणाऱ्या माणसांना सुद्धा हसवा.
आयुष्य फार कमी आहे त्यात हे माझं ते माझं आणि हेवेदावे करीत बसण्या पेक्षा आपल्यावर जीव असलेल्या आपल्या माणसांना प्रेम द्या आणि प्रेम घ्या. आनंद वाटल्याने वाढतो असं म्हणतात. एखाद्या दुःखी कष्टी माणसाशी बोला कारण तुमच्या बोलल्याने काही काळ का होईना ती व्यक्ती स्वतःचे दुःख विसरू शकते. रडक्या मालिका आणि बिनबुडाचे कार्यक्रम बघण्याच्या भानगडीत न पडता विनोदी आणि तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टी पहा. आयुष्यात अगोदरच प्रचंड व्याप ताप असतांना रडक्या गोष्टी पाहून स्वतःला कष्ट करून घेऊ नका.. हसण्यासाठी जन्म आपला.. आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे ही मनोवृत्ती जोपासा आणि आपल्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला हसण्याचे आणि अगदी काहीही झाले तरी आनंदी आणि बिनधास्त राहण्याचे महत्व पटवून द्या..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र.
Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.