मनातलं पान : संशयाचं भूत..

एकवेळ भांडखोर स्वभाव परवडला पण संशयखोर स्वभाव अजिबात परवडत नाही.. संशयाचं भूत एकदा का  तुमच्या मानगुटीवर बसलं की ते वेताळ सारखं घट्ट चिकटून बसतं. संशयाचे किडे डोक्यात गेले की मग ते किडे हातपाय पसरू लागतात आणि मग एकातून दुसरा संशय, दुसऱ्यातून तिसरा आणि तिसऱ्यातून चवथा संशय असं हे जाळं त्या संशयी माणसाचं मन आणि मेंदूवर कोळी जसा जाळं विणतो तसं जाळं विणून त्या जाळ्याची पाळंमुळं अगदी खोलवर रुजवतं.. भित्या पाठी जसा ब्रह्म राक्षस असतो तसा संशयी व्यक्तीच्या मागे त्याचा संशयी स्वभाव हात धुवून लागतो. ही व्यक्ती मग स्वतःची सद्विवेक बुद्धी गमावून बसते. ज्याच्यावर या व्यक्तीचा संशय आहे अशी व्यक्ती हसली, रडली, कुणाशी बोलली, कुणासोबत दिसली, गप्प बसली तरी या संशयी व्यक्तीला वाटते की हा असं आपल्याला जळवायला मुद्दाम वागत आहे. अशा व्यक्तीच्या तुम्ही कितीही कानी कपाळी ओरडून सांगितलं तरी या व्यक्तीला तुमचं म्हणणं पटतच नाही. तुम्ही अगदी तुमचं काळीज कापून दिलं तरी या व्यक्तीला तुम्ही नाटक करताय,फसवताय असंच वाटतं. आग असल्याशिवाय धूर निघत नाही असं म्हणतात ते अगदी बरोबर आहे. पण कधी कधी धूर निघावा म्हणून मुद्दाम आग लावलेली असते.. काही तरी माहिती काढण्यासाठी असा भास निर्माण करावा लागतो. म्हणजेच डोळ्याने पाहिलेलं आणि कानाने ऐकलेलं सुद्धा खूपदा खोटं असू शकतं. पण हे या संशयखोर व्यक्तीला पटतच नाही. संशयी स्वभावाने पती पत्नी, मित्र मैत्रिणी आणि इतरही अनेक नाती तुटलेली आहेत. मात्र, यातून जे हुशार आहेत ते धडा घेतात आणि ज्यांना संशयातच दवडायचं आहे ते संशयच घेत राहतात.

मेंदूचा अभ्यास करणारे वैज्ञानिक, डॉक्टर, मानसोपचार तज्ज्ञ आणि समुपदेशक सुद्धा अशा लोकांसमोर हार मानतात तर तुम्ही आम्ही कोण आहोत हो. संशयाला औषध नाही तो एक मनोविकार असल्याचं जाणकार सांगतात. एखाद्यावर विश्वास ठेवायचाच नाही असं जर मनातून अगोदरच ठरवलं असेल तर अशी मंडळी देव जरी सांगायला आला तरी ऐकणार नाहीत. संशय हा सुद्धा मनोविकार आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. काही तज्ज्ञांच्या मते ज्या स्त्रिया अथवा पुरुष तुमच्यावर इतर स्त्री अथवा पुरुषाशी बोलल्यावर संशय घेतात त्यांना तुम्हाला गमावण्याची भीती असते. अशा व्यक्ती तुमच्या प्रेमात पडलेल्या असतात म्हणून तुम्ही इतर कुणाशी बोललेलं त्यांना सहन होत नाही. पण यातील बरेच लोक हे प्रेमात पडल्याचं सत्य लोकांना घाबरून स्वीकारीत नाहीत. जर या व्यक्ती तुमच्या प्रेमात पडलेल्या नसतील तर समोरच्यावरून  तुम्हाला इतकं कधीच छळणारा नाहीत. शब्दाने शब्द वाढत जातो व भांडण होऊन चांगल्या नात्याला सुरुंग लागू शकतो. आपण त्या संशयी व्यक्तीला आपल्या परीने खूप समजावलेले असेल व तरी ती व्यक्ती ऐकत नसेल तर अशावेळी आपण गप्प बसायला हवे. त्या व्यक्तीला जे बोलायचे ते बोलू द्यावे आपल्याला ऐकायला काय जातेय. आपण ऐकल्याने या व्यक्तीलाही मनातून समाधान मिळते.. या व्यक्तीला कदाचित काही काळ निघून गेल्यावर ती घेत असलेल्या संशयाची जाणीव होईल.. शेवटी संशयाच्या भुताला आणि स्वभावाला इलाज नाही आणि ते मानगुटीवर बसल्याने सहजा सहजी खाली उतरणार सुद्धा नसतं.. 

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

51

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.