रोशन सातारकर यांचं आणखी एक बहारदार गाणं इथे सादर करीत आहे. पूर्वीच्या काळी लोकगीतं आणि तमाशाच्या माध्यमातून खूप प्रभावीपणे वास्तव मांडलं जात होतं..
आज सुद्धा काही सन्माननीय अपवाद वगळता काही स्त्री पुरुष असेच वागतांना दिसत आहेत. अर्थात कुणी कसे वागावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण, आपण ' मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली..' या टाईपची असू तर मग लोकांना उगीचच मी अशी आणि मी तशी असा शहाजोगपणा मिरवीत फिरू नये. काही पुरुष सुद्धा असेच आहेत बरे. माझ्या ओळखीत कितीतरी स्त्री पुरुष असे आहेत की, त्यांना आता त्यांच्या बायका आणि नवरे आवडत नाहीत का तर ते म्हातारे आहेत म्हणून..
आज जवळपास ८० टक्के संसार लोक काय म्हणतील आणि मुलं बाळं आहेत म्हणून मनावरून निभावले जात आहेत. माझ्या संपर्कातल्या काही जणींनी तर त्यांचे म्हातारे जोडीदार फक्त लोकलज्जेखातर आणि घरातल्यांना घाबरून सोबत ठेवले आहेत. हा आता बाहेर अशा महिला खूप रंग उधळून दिवेलागणीला घरी येतात हे सांगण्याची इतरांना गरज नाही म्हणा. आणि खूपसे पुरुष सुद्धा असेच आहेत. म्हणून रोशन सातारकरांच्या आवाजातील अजूनही यौवनात मी समजणाऱ्या बायांची व्यथा या गाण्यात खूप छान मांडली आहे......
मनात हाय आता सांगूच काय ग
कशी काय येऊ मी रंगतील.?
म्हातारा नवरा गंमतीला..
मी नवतरणी आले भरात
कसं तरी होतंय माझ्या ऊरात
हा बैलबश्या, करील हशा
राहू कशी बाई याच्या संगतीला.?
म्हातारा नवरा गंमतीला..
फिरवेना कधी तो प्रेमाचा हात
हा नुसताच दावतोय नवऱ्याचं नातं
काढुनी कळ, दावितो बळ
शोभला का माझ्या पंगतीला.?
कसं काय येऊ मी रंगतील.?
म्हातारा नवरा गंमतीला..
इसळगा बाई मुलखाचा ग
गेनं गेल्यावानी डोक्याचा ग
नको अशी साथ, जोडिते हात
जाळू का मी माझ्या नवतीला.?
कसं काय येऊ मी रंगतील.?
म्हातारा नवरा गंमतीला..
कपडे आणि चेहरा बघण्यापेक्षा कर्तृत्व बघून संधी द्यायला हवी.. पण आपण प्रत्येक चमकणारी गोष्ट सोनं समजतो आणि तिथेच फसतो..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.