मानवी उत्क्रांतीच्या काळात कंद मुळे खाऊन गुहेत राहणार माणूस जेव्हा नदी किनारी रहायला आला व त्याला आगीत भाजलेल्या मांस तथा इतर गोष्टींचा स्वाद लक्षात आला तेव्हापासून वेगवेगळ्या देशांतील, वेगवेगळ्या प्रांतांतील खाद्यसंस्कृती आपलं वेगळेपण घेऊन खाद्यरसिकांच्या जिभेचे चोचले पुरवू लागली असे म्हटल्यास वावगे ठरू नये. हे सर्व करतांना या पदार्थांना चांगली चव लागावी म्हणून मसाल्यांचा, तेलाचा, मिठाचा, साखरेचा, तिखटाचा वापर केला गेला. यातही कुठले मसाले व कुठले अन्न कुठल्या व्यक्तीच्या तब्येतीला मानवेल मानवणार नाही याचा ही विचार केला गेला. काही प्रांतांत त्यांची खासियत असलेलं वेगवेगळ्या प्रकारचं अन्न बनवलं जाऊ लागलं. जसजसा प्रवास सुखकर झाला आणि लोक एकमेकांच्या जवळ येऊ लागले तसतसं त्या त्या प्रांतातील अन्न आपल्या ताटातून पोटात जाऊ लागलं. वेगवेगळ्या प्रकारच्या धान्याच्या भाकरी, रोट्या, पोळ्या आणि वेगवेगळ्या भाज्या आपल्या ताटात येऊ लागल्या. यातील काही भाज्या या त्या त्या सिझन पुरत्या म्हणजे पावसाळा, हिवाळा, उन्हाळा यातच मिळणाऱ्या असल्याने त्यांची लज्जत आपल्या जिभेची चव भागवू लागली. वेगवेगळी फळे सुद्धा मग आपल्या दिमतीला आली. तेच तेच रोज खाण्या पेक्षा वेगवेगळ्या रेसिपी बनविल्या जाऊ लागल्या आणि त्या लोकांना आवडू सुद्धा लागल्या.
हे एवढं जरी असलं तरी देश विदेशात खाणाऱ्यांचे दोन प्रकार पडले एक शाकाहारी आणि दुसरा मांसाहारी. आज रोजी या दोन्ही प्रकारची लोकं जगभरात आपल्याला पाहायला मिळतात. त्यात गोड खाणारे, डाएट करणारे, फक्त फळे खाणारे असे अनेक भेटतील.. नॉनव्हेज मध्ये मटण, चिकन, अंडी, विविध प्रकारचे मासे, कोळंबी, बोंबील, सुकट, खेकडे आणि काय काय प्रकार आपल्याला पाहायला मिळतात तर व्हेज मध्ये सर्व प्रकारच्या पालेभाज्या कडधान्य आपल्या सेवेला तत्पर असतात. यात तेल तुपाचा मसाले आणि मिठाचा जो तो आपापल्या आवडीनुसार वापर करीत असतो. काही लोक खाण्याच्या बाबतीत खूपच चोखंदळ असतात. तर काही लोकांना डॉक्टरांनी त्यांच्या तब्येतीसाठी हे खाऊ नका ते खाऊ नका अशी तंबी दिलेली असते. नॉनव्हेज अन्नात जेवढी सकसता असते तेवढीच सकसता व्हेज अन्नातही असते फक्त काय खावे आणि काय खाऊ नये हे आपणांस कळायला हवे. बाकी सिझन कुठलाही असो खवैय्या लोकांना खाद्यपदार्थांवर ताव मारायचा असतो. आयुष्य एकदाच मिळत असल्याने बिनधास्त खा आणि बिनधास्त रहा, खाण्यासाठी जन्म आपला असं हे लोक सतत म्हणत असतात..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.