खरं तर आंधळ्यांच्या शहरात आरसे विकणे हा शुद्ध वेडेपणा आहे. पण, तरी काही लोक तो वेडेपणा करतात कारण त्या आंधळ्यांत सगळे नजरे समोर मिट्ट काळोख दिसणारे असणारे आंधळे नसतात. तर, बरेचसे डोळस आंधळे असतात. पण हे डोळस आंधळे संपूर्ण आंधळ्यांपेक्षा जास्त आंधळे असतात. एकवेळ आपण मान्य करू की समोरची व्यक्ती पूर्ण आंधळी आहे तिला काहीच दिसत नाही. तात्पर्य काय तर ज्यांना दिसतच नाही त्यांना काही बोलण्यात अर्थ नसतो कारण दुर्दैवाने नशिबाने त्यांना अंध केलेले असते. पण ज्यांना दिसूनही दिसत नाही त्यांना काय म्हणायचं हो..?? 'देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी..' खरंच अशा लोकांची झोळी दुबळीचं असते. समोरून वेगवेगळ्या संधीची गंगा वाहत असतांना केवळ तुमच्या आळशीपणामुळे अथवा समोरच्याला गृहीत धरण्यामुळे अथवा आपल्याला काय करायचंय बघू नंतरचं नंतर या तुमच्या सवयीमुळे तुम्ही त्या वाहत्या गंगेत हात धुवू शकत नाही. मग आता यात दोष कुणाचा ? तुम्हाला वेळोवेळी पोटतिडकीने संधी देणाऱ्या त्या आरसे विकणाऱ्याचा की तुमच्या नशिबाचा..
आपलं नशीब आपल्यालाच घडवायचं असतं आणि निसर्ग आपल्याला संधी देतच असतो. मात्र, ती संधी आपल्याला ओळखता येत नाही, घेता येत नाही त्याला तो बिचारा निसर्ग तरी काय करणार हो.. हल्लीच्या काळात समोरच्या व्यक्तीच्या भल्याचा प्रामाणिकपणे विचार करणे गुन्हा ठरत आहे. ज्याचा विचार करावा त्याला वाटतं हा समोरचा काय रिकामाच आहे आणि आपण काय तेवढे कामाचे.. पण जरा तुमच्या हृदयावर हात ठेवा डोळे बंद करा आणि विचारा स्वतःच्या मनाला निस्वार्थीपणे तुमच्यासाठी आरसे विकणाऱ्या व्यतिरिक्त इतर कुणी तुमच्या भल्याचा इतका खोलवर कधी विचार केला आहे काय..?? हल्लीच्या काळात स्वतःच्याच पोळीवर तूप ओढून घेणारे लोक आहेत. हे लोक फक्त स्वतःच्याच पोळीवर तूप ओढत नाहीत तर तुमची पोळी सुद्धा ओढून खातात.. म्हणूनच असं वाटू लागलंय की आता आंधळ्यांच्या शहरात आरसे विकण्यात काही अर्थ नाही..
- प्रा. दिपक जाधव.. शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.