मनातलं पान : पानिपतच्या युद्धात विश्वास मारला गेल्याचा लावला गेलेला अर्थ आणि नात्यांची गुंतागुंत..

१४ जानेवारी १७६१ रोजी मराठे आणि अब्दालीत पानिपत येथे घनघोर युद्ध झाले. मराठ्यांच्या समशेरीची  चपराक आणि धसका अब्दालीला जबरदस्त बसला.. पानिपत युद्धात "लाख बांगडी फुटली , दोन मोती गळाले, २७ मोहरा हरवल्या आणि चिल्लरखुर्दा किती गेला याची गणना नाही ... तरी पानिपत चे युद्ध मराठे राष्ट्र रक्षणासाठी लढले हे महत्वाचे आहे, मराठ्यांनी अब्दालीला असा तडाखा दिला की परत त्याने दिल्लीकडे पाहण्याचे धाडस केले नाही..! हिमालयाच्या रक्षणासाठी सह्याद्री धावला होता हा इतिहास आहे..

याच युद्धात विश्वासराव पेशवे मारले गेले होते. केवळ नावात विश्वास म्हणून कुणाचं काही बिनसलं तर विश्वास मारला गेला असा अर्थ लावला जातो. खरं तर नात्यातला विश्वास आणि विश्वासराव यांचा अर्थाअर्थी काही संबंध नाही. पण ही म्हण मात्र पडून गेली ती कायमची पडलीच.. आज आपण एकमेकांच्या चुका दाखविण्यात धन्यता मानतो मात्र एखादे संबंध दुरावल्यावर किंवा दुरावतांना ते का दुरावले याचा आपण विचार करीत नाही. आणि केला तरी त्याचा अर्थ आपण आपल्या सोयीनुसार लावतो. आपण स्वतः किती बरोबर आहोत अथवा होतो हे बघण्याच्या नादात आपण चुकीचे सर्व खापर समोरच्यावर फोडून मोकळे होतो. मान्य समोरचा चुकला असेल तुम्ही समजता तसं. पण तो शंभर टक्के चुकला असं कधीच होत नाही हो.. तो नव्वद टक्के चुकला असेल तर तुम्हीही दहा टक्के चुकलातच ना. लोकांच्या ढीगभर चुका लक्षात ठेवतांना स्वतःची गुंजभर चूक झाली हेही मानण्याचे मनाचे मोठेपण तुमच्याकडे नसेल तर त्या नात्यांमध्ये गुंतागुंत वाढतच जाते. नात्यांना प्रेमाने जोपासल्या शिवाय विश्वासाचे कोंब फुटत नाहीत.. याच्या त्याच्यावर खापर फोडण्याच्या नादात आपली काय चूक झाली याचाही आपण साधक बाधक विचार करायला नको का.. करायलाच हवा.. आणि पुन्हा ते संबंध जुळू लागले तर आपण तेच तेच उगाळीत बसून वैचारिक दृष्ट्या मागास ठरू नये. आपण मोठे असू तर मनाने आणि मानाने सुद्धा नेहमी मोठेच रहायला हवे.. आनंद वाटल्याने वाढतो आणि काही गोष्टींकडे मोठेपणाने दुर्लक्ष सुद्धा करायचं असतं तात्पर्य काय तर नात्यांमध्ये समंजसपणा दाखवून चार पावलं मागे आल्याने नाती आणखी घट्ट होतात.. पटतंय ना..??

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

78

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.