मनातलं पान : पैसा झाला मोठा पण माणुसकीला मात्र तोटा..

लक्ष्मीच्या घरी सरस्वती पाणी भरते असं म्हणतात ते काही खोटं नाही. तुमच्याकडे फक्त हुशारी असून आजच्या जगात अजिबात चालत नाही. तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्हाला आणि तुमच्या हुशारीला कुणीही विचारीत नाही. तुम्ही एखादी खरी गोष्ट कितीही बेंबीच्या देठापासून समोरच्याला ओरडून सांगितली तरी ते त्या समोरच्याला खरे वाटत नाही. कारण तो तुम्हाला गृहीत धरू लागलेला असतो. हुशारीला वयाची गरज नसते हे या अल्पमती लोकांना कळतच नाही. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली तेव्हा त्यांचे वय लहान होते. पण, जे मोठ्या योगी पुरुषांना जमलं नाही ते माणसाच्या आयुष्याचं सगळं गणित माऊलींनी निरीक्षणावर आणि अनुभवलेल्या प्रत्यक्ष जगण्यावर मांडले आहे. एखाद्या सात वर्षाच्या मुलाला परिस्थिती जो अनुभव देते व त्याने त्या मुलाच्या जाणिवा पोक्त होतात तसा अनुभव एखाद्या सत्तर वय असलेल्या सुखवस्तू माणसाला नसू शकतो. पैशापुढे सगळी नाती पोकळ ठरतात. फार अगदी अल्प स्वल्प बोटावर मोजण्या इतकी माणसं पैशा पेक्षा माणुसकी आणि हुशारीला महत्व देतात. मान्य पैसे खूप महत्वाचे असतात आयुष्यात. पण, म्हणून पैसे नसलेल्यांना लगेच तुम्ही मोडीत काढणार काय..?  पिढीजात पैसेवाल्याने आणखी पैसे कमावले तर त्यात शेखी मिळविण्याचे मुळीच कारण नसते. ज्याने शून्यातून सुरुवात केलीय आणि हळूहळू प्रगतीच्या दिशेने निघाला आहे अशा व्यक्तीचे मोठेपण आम्हाला तरी जास्त वाटते. आणि पैसे नसल्याने लहानांपासून थोरांपर्यंत सतत सगळ्यांचे सतत सल्लेच  ऐकावे लागतात.

काही लोक प्रामाणिकपणे पोटतिडकीने सल्ले देतात तर काही जण हा काय डफर आहे याला काहीच येत नाही म्हणून सल्ले देतात. पोकळ सल्ले देण्यापेक्षा प्रत्यक्ष मदत करा कारण अडचणीत असलेला हुशार आहे पण त्याचं नशीब सध्या त्याच्या बाजूने नाही हे कायम लक्षात ठेवा.. अंधारा नंतर प्रकाश पडतोच तसं मेहनती माणसांना आज ना उद्या यश मिळतंच. म्हणून कुणाच्या गरीब परिस्थितीवर, अपयशावर आणि नशिबावर अजिबात हसू नका.. प्रत्येकाची चांगली वाईट वेळ येत जात असते.. वय, पैसा, आणि प्रसिद्धी खूप चंचल असते म्हणून कधीच डोक्यात हवा जाऊ देऊ नका. तुमचा बॅड पॅच असेल ना तेव्हा ज्याला नाक सुद्धा धड पुसता येत नाही तो ही तुमच्यावर हसतो आणि ते तुम्हाला सहन करावं लागतं.. काही मंडळी खूप गोड गोड बोलतात पण आपण प्रामाणिकपणे केलेल्या कामाचे पैसे द्यायला टाळाटाळ करतात आणि विचारलं तर बोलणं सोडून देतात. काही मंडळींना वाटतं आपण त्यांचं सगळं अगदी सगळं काम नेहमी फुकटातच करून द्यावं.. स्वतःचा फायदा बघतांना समोरच्याला सुद्धा पोट आहे हे मात्र हे लोक सोयीस्करपणे विसरून जातात. म्हणूनच सांगावंसं वाटतं पैशावरून कुणाला मोजू नका प्रत्येकाचे दिवस येतात. कुणाचे लवकर येतात तर कुणाचे उशिरा....

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

56

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.