मनातलं पान : माणूस माणसापासून दूर चालला आहे..

कुणी कितीही नाकारलं तरी सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात माणूस माणसापासून दूर चालला आहे असे म्हटल्यास कुणाला वावगे वाटण्याचे मुळीच कारण नाही. पंधरा पैशाच्या पोस्ट कार्ड मध्ये आणि पंचवीस पैशाच्या आंतरदेशीय कार्ड मध्ये जे प्रेम आणि जिव्हाळा होता तो आता हातात मोबाईल असूनही बघायला मिळत नाही. बोटावर मोजण्या इतकी कमी माणसं आज स्वतःहून समोरच्या मेसेज करून हाक हवाल विचारीत आहेत. सर्वांनी एकत्र यावं त्यानिमित्ताने भेटीगाठी आणि ख्याली खुशाली कळेल यासाठी धडपडत आहेत. पण या अशा माणसांना हे काय रिकामटेकडे आहेत असे समजून आम्हीच फार कामात व्यस्त या अविर्भावात टाळले जात आहे. आज काही लोक स्वतःला इतके बिझी समजत आहेत की त्यांना माणुसकीच्या नात्याने केलेल्या मेसेजला बघूनही रिप्लाय द्यायला सुद्धा वेळ नाही. तुम्हाला ती बैलगाडीची गोष्ट ठाऊक असेलच कदाचित.. बैलगाडी बैल ओढत असतात आणि बैलगाडीच्या खाली सावलीत कुत्रं चालत असतं आणि त्या कुत्र्याला सतत असं वाटत असतं बैलगाडी आपणच ओढतोय. तान्ह्या बाळाचं सुद्धा आई वाचून अडत नाही हो. पण माणुसकी जोपासायची म्हणून नाती टिकवायची असतात हो.. अर्थात ज्यांना ती टिकवायचीच नाही त्यांना बोलण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही. पोस्ट कार्ड आणि आंतरदेशीय पात्राची ज्या आतुरते वाट पहिली जायची त्या आतुरतेने आज मोबाईल हातात असूनही फोन अथवा साधा मेसेज केला जात नसल्याची खंत हृदयात राम असलेल्या माणसांना सतत जाणवत राहते. आणि म्हणूनच तो पोस्ट कार्ड आणि आंतरदेशीय पत्राचा जमाना खूप चांगला होता असे माझे स्पष्ट मत आहे कारण तेव्हा माणसं माणसांत होती. आजही आहेत पण फार थोडी बोटावर मोजण्या एवढी. मी जर कुणाला कसा आहेस बाबा असा मेसेज अथवा फोन केला नाही तर मला चैन पडत नाही कारण आपण माणुसकी जोपासणारी माणसं आहोत. मीही माझ्या कामात प्रचंड बिझी असतो पण त्याचा परिणाम माझ्या नातेसंबंधांवर अजिबात होऊ देत नाही.

गोष्ट कालचीच माझे अत्यंत जवळचे मित्र जवळपास रोजच आम्ही एकमेकांना प्रत्यक्ष भेटतो. कालही तशीच भेट झाली त्यांचा मूड खूप ऑफ होता. काय झालं विचारलं तर त्यांनी सांगितलं त्यांचा एक मित्र खूप दिवस संपर्कात नव्हता. नेहमी हसून खेळून बोलणारा हा मित्र.. काल आमचे मला रोज भेटणारे मित्र त्या त्यांच्या मित्राच्या एरियात गेले होते. आपण भेटूया म्हटले त्याला खूप दिवस संपर्क नाही म्हणून ते त्याच्या घरी गेले. त्याच्या मिसेसला विचारले कुठे गेला आमचा मित्र तर तिने सांगितलं त्यांचं निधन झालं.. अरे देवा..!! माझ्या या मित्राला इतका धक्का बसला की ते स्वतःलाच दोष देऊ लागले. त्याने संपर्क नाही केला तर आम्ही तरी त्याला संपर्क करायला हवा होता म्हणजे त्याच्या घरून त्याच्या निधनाचे कळले तरी असते. तात्पर्य काय तर माणसाचे आयुष्य म्हणजे पाण्याचा बुडबुडा आहे म्हणून आपल्याशी चांगलं वागणाऱ्या आपल्या माणसांना तुम्ही कितीही बिझी असलात तरी वेळ द्यायला शिका. मी हे जनरल बोलतोय बरे कारण आपण बोललेलं लिहिलेलं कुणाच्या नी कुणाच्या तरी आयुष्याशी थोडं कमी जास्त प्रमाणात साधर्म्य दाखविणारं असू शकतं मग हे लोक स्वतःची चूक लक्षात न घेता माझ्यावर नाराज होतात. हा असा माझा अनुभव आहे. असो.. पोस्ट कार्ड आणि आंतरदेशीय पत्राच्या काळातील माणसं आज हरवत चाललीत ही खंत कायमच मनात राहील..

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

66

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.