आनंद वाटल्याने वाढतो आणि दुःख वाटल्याने कमी होते..म्हणून माणसाने नेहमी आनंदी आणि बिनधास्त राहण्याचा प्रयत्न करावा. आनंदी रहायला प्रत्येकच वेळी खूप पैसे लागतात असे ही नाही आपले चित्त आणि वृत्ती आनंदी असली आणि आपण समजूतदार असलो की मग कुठल्याही गोष्टीत आपण आनंद मिळवू शकतो. मनात कुढत बसण्यापेक्षा आपले दुःख आपल्या जवळच्या माणसासोबत शेअर केल्याने मन हलकं होतं. पण तो समोरचा माणूस मात्र भरवशाचा असायला हवा. मी अनुभवलेलं सांगतो खूपसे लोक इतरांचे दुःख त्या वेदनेत असलेल्या माणसासोबत रडून ऐकतात. मात्र तिसऱ्या व्यक्तीला सांगतांना हे दुःख हसून सांगतात. म्हणून अगदी कुणासमोर ही आपले रडगाणे गाऊ नये. आनंदी माणूस सर्वांनाच हवाहवासा वाटतो. आपल्याला कितीही समस्या असल्या तरी आपण इतरांना आनंद द्यायचा असतो. अत्तर आणि अगरबत्ती सारखा आपल्या आनंदाचा सुगंध सर्व दूर पसरायला हवा. आणि आपण कुणाच्या तरी आनंदाचे कारण आहोत ही गोष्ट खरंतर फार बहुमूल्य आहे. कुणासाठी तरी आपण आनंदाचे झाड होणे हे नशीबवान माणसालाच जमते. हे झाड होण्यासाठी सुद्धा खूप भाग्य लागते. आपले बाहू पसरून प्रेम देण्याने जर कुणाचं आयुष्य उजळणार असेल तर आपण एखाद्याचं जगणं उजळवणारा लकाकता सूर्य व्हायला अजिबात मागे पुढे पाहू नये. जन्माला यायचं खायचं प्यायचं आणि एकेदिवशी मरून जायचं असं न करता जन्माला येऊन एखाद्या समस्येने व्यापलेल्या माणसाला तुम्ही हात देऊन आनंदी केलंत तर निश्चितच तुम्ही पुण्य करीत अहात आणि याची नोंद निसर्ग सुद्धा ठेवील.. जगा आणि जगू द्या हे तत्व अंगीकारा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे समोरच्या त्या आपल्या माणसाला माफ करायला शिका. असे केल्यास त्याच्या नजरेत तुमची किंमत आणखी वाढेल.. आयुष्य दोन घडीचा डाव आहे.. इथे राजे महाराजे मातीतून आले आणि मातीतच गेले.. तुम्ही आम्ही कोण आहोत हो.. आनंद ही आपली शिदोरी आहे आणि प्रेम ही त्या शिदोरीची रसद.. मनमुराद जगा आणि तुम्हाला आपलं मानणाऱ्यांवर स्वतःला उधळून टाका.. ऐकलंत का.. मनाचा दरवाजा उघडा.. आनंद तुमच्या दाराबाहेर केव्हाचा तुमची वाट पाहतोय.. सोबत तुम्ही ज्याला आनंद देणार अहात तो / ती व्यक्ती सुद्धा आली आहे..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.