मनातलं पान : अर्ध औषध..अर्ध प्रेम.. अर्धी मैत्री आणि अर्ध सत्य कधीच आनंद देत नाही..

मैत्री असो, प्रेम असो, नातेसंबंध असो अथवा दुश्मनी असो.. जे करायचं ते बिनधास्त आणि पूर्णपणे स्वतःला त्यात झोकून देऊन करायचं.. एकतर काहीही करण्या अगोदर, कुठल्याही नात्यात पडण्या अगोदर शंभरदा विचार करायचा आणि एकदा त्यात पडलं की मग काठावर न राहता स्वतःला पूर्णपणे त्या नात्यात झोकून द्यायचं मग आर या पार.. एक तर चांगलं होईल नाहीतर वाईट होईल.. आपल्याला कुणी हात सोडून अथवा  दुनियेला घाबरून पळून गेले असं तरी म्हणणार नाही ना मग..

आपल्याला एखादा शारीरिक अथवा  मानसिक आजार झाला आणि डॉक्टरांनी औषध दिलं तर त्यांनी जेवढा औषधाचा डोस दिला आहे ते तेवढेच घेणे गरजेचे असते. जर तुम्ही अर्धीच औषधं घेतली तर तुम्ही पूर्णपणे बरे होऊच शकणार नाही. बरं व्हायचं असेल तर औषध गोड असो व कडू ते घ्यायलाच हवं.. 

प्रेमाचं ही तसंच आहे ते कुणाशीही, कुणालाही आणि कुठल्याही वयात होऊ शकतं. यात फक्त तरुण तरुणीचं नसतात तर विवाहित सुद्धा असतात. प्रेमाचा आणि वयाचा, जातीचा, देशाचा, रंग रूपाचा काहीच संबंध नसतो. विवाहितांचं अविवाहितांवर होऊ शकतं आणि विवाहितांचं दुसऱ्या विवाहितांशी सुद्धा होऊ शकतं. दुनिया काय बोलेल यापेक्षा आपल्याला यात आनंद मिळतोय की नाही हे बघणे नेहमी गरजेचे असते.  दुनिया इतरांना सल्ले द्यायला नेहमी पुढे असते.. आणि स्वतःवर आलं की मग बिनधास्त जगते, तेव्हा दुनिया तुमचा सल्ला घ्यायला येत नाही. लोकांना घाबरला तर काहीच होणार नाही आयुष्यात. आणि पळून गेलात तर तुम्ही गद्दार आणि पळपुटे अहात हे तुमचं तुम्हीच सिद्ध करता. म्हणून इतर काय बोलतात यापेक्षा तुम्हाला काय वाटतं  याचा विचार करून तुमच्या समोरच्याला फसवू नका..

त्यानंतर येते ती अर्धी मैत्री.. काही जण म्हणतात मैत्री करा पण स्वतःला त्यात गुंतवून घेऊ नका. जे असं म्हणतात ते महामूर्ख आणि स्वार्थी असतात. कारण जर मैत्रीत स्वार्थ पाहिला आणि गरजेपुरताच  व्यवहार केला तर ती मैत्री होऊच शकत नाही. तो तुमचा स्वतःच्या फायद्यासाठी समोरच्या मित्राचा करून घेतलेला वापर असतो. मैत्री ही मैत्रीच असते. समोरचा वाईट वागला तर नियती त्याला धडा देतेच. पण, टाळी एका हाताने वाजत नसल्याने त्यावेळी आपण कुठे चुकलो याचाही विचार करायलाच हवा..

आणि सर्वात डेंजर ते म्हणजे तुम्ही बोलत असलेलं अर्ध सत्य.. अर्ध सत्य तुम्ही मनातून खूप आत्मकेंद्री आणि विषारी अहात याची साक्ष देते. समोरच्याला घोळवत ठेवून सतत खोटं बोलण्या सारखं आहे हे.. जे काही आहे ते तोंडावर रोखठोक बोलून टाका ना. तुम्ही मनात काही गोष्टी दाबून ठेवता आणि तुमच्या दुसऱ्या मनात अरे याला कळलं तर ही भीती असल्याने स्वतःचा बचाव करण्यासाठी तुम्ही अर्ध सत्य बोलता. म्हणजे वेळ आल्यावर समोरच्याला सांगता येतं अरे मी तर तुला बोललेलो.. अरे पण तू पूर्णसत्य कुठे बोलला होतास..

तात्पर्य काय तर कुठलीही गोष्ट करतांना ती पूर्ण करा याला त्याला घाबरून करू लागलात तर कुठल्याच नात्याला तुम्ही न्याय देऊ शकत नाही आणि समोरच्या व्यक्तीच्या मनात तुम्ही चीटर अहात आणि हात सोडून पळून गेलेले घाबरट स्वार्थी व्यक्तिमत्व अहात असा शिक्का बसेल.. आणि तो कायम राहील..

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

102

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.