आज खूपशा गोष्टी लोक काय म्हणतील म्हणून घाबरून आपण करीत नाही. आपली आवड निवड छंद आणि समोरचा चांगला की वाईट यावर मारला गेलेला शिक्का सगळं लोकांना घाबरून करायचं अथवा नाही करायचं . कधी कधी कानाने ऐकलेलं, डोळ्याने पाहिलेलं सुद्धा खरं नसतं. त्यापाठी ते बोलणाऱ्या लिहिणाऱ्याचा वेगळा उद्देश असू शकतो हे आधी लक्षात घ्या. आणि परिपूर्ण कुणीच नसतो हो. जर आकाशात देव असेल तर तोही परिपूर्ण नाही. कुठल्याही नात्यात चांगल्या वाईट गोष्टी आणि भांडणं, मतभेद, रुसवे फुगवे चालतातच. आणि भांडण होणे हे जिवंतपणाचे लक्षण आहे असे आमचे स्पस्ट मत आहे. ज्यास्त गोड गोड बोलल्याने मानसिक मधुमेह होतो. जिथे आपल्यापैकी कुणी चुकत असेल तर तिथे स्पष्ट बोलायलाच हवे. बरोबर ना.. पण आपल्यातील हे भांडण विकोपाला न जाऊ देता कुणी तरी माघार घ्यायला हवी. अर्थात नातं टिकवून ठेवायचं असेल तर. आणि जो माघार घेतो तो मुळीच घाबरट नसतो उलट तो खऱ्या अर्थाने दिलदार आणि शूर असतो हेही आपण लक्षात घ्यायला हवे. बरं हे मैत्रीचं नातं सर्वकाही विसरून पुन्हा जुळलं तरी लोक काय म्हणतील म्हणजे मित्र मैत्रिणींची भीती. आता हे मित्र मैत्रिणी त्यांचं त्यांचं आयुष्य जगतांना प्रत्येकच गोष्टीचा सल्ला तुमच्याकडे मागतात काय हो..? तुम्ही हो समजत असाल तर तुमच्या एवढे वेडे तुम्हीच असाल.
आयुष्यात काही गोष्टी अशा असतात की त्या फक्त स्वतः पुरत्याच सीमित असतात अगदी कुणीच कुणालाच सांगत नाही हो.. हे कायम लक्षात ठेवा. आपण आपलं जगायचं हो.. लोकांचा विचार केलात तर लोक आपल्याला घोड्यावर बसू देणार नाहीत आणि पायीही चालू देणार नाहीत. लोकांनी सीता मातेला सुद्धा सोडलं नाही तर तुम्ही आम्ही कोण आहोत हो.. आणि त्यात आपले मित्र मैत्रिणी चुगलखोर असतील तर मग झालंच कल्याण. आणि यातल्या खूपशा मित्र मैत्रिणींना सतत वाटत असते की आपले ज्याच्याशी बिनसले आहे त्या व्यक्तीशी पुन्हा आपले कधीच मैत्रीचे नाते जुळू नये म्हणून.. पण कुणाचं किती ऐकायचं हे आपल्याला कळायला हवं.. आपण लोकांचेच ऐकत राहिलो तर कुठल्याच नात्यात यशस्वी होणार नाही. म्हणून चुगलखोर लोकांना आपल्यापासून दूर ठेवायचं आणि आपल्याला जे खटकतंय त्याचा जाब आपल्या समोराच्याला विचारायचा. कुटुंब असो अथवा मित्र मैत्रिणीचं नातं.. दोघांत तिसरा आला की सर्व काही विसरा असंच होतं आणि कायम होत राहील.. येतंय का लक्षात..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.