आज मी जवळपास सर्वच लेखक आणि कवी मंडळींच्या मनातलं प्रातिनिधिक बोलतोय.. होतं काय की विविध प्रकारच्या कथा असो, सुख दुःखाच्या, प्रेमाच्या, विरहाच्या कविता असो अथवा एखादा लेख, चारोळी, दुनोळी, एकोळी अथवा अगदी कुठल्याही प्रकारचं लेखन असो.. आज मी माझा स्वानुभव सांगतोय.. आपण जे पाहिलेलं, अनुभवलेलं, इतरांचं ऐकलेलं, वाचलेलं अथवा कल्पनाविलासाने लिहिलेलं असं काहीही लिहिलं असो बहुतांश वाचकांना याने हे आपल्याला आनंदी करायला, दुःखी करायला, खिजवायला अथवा मार्गदर्शन करायला लिहिलं आहे असं वाटतं. व्यक्ती तितक्या प्रकृती आणि प्रवृत्ती असल्याने जो जे वांच्छिल असा खुशाल आपल्या लेखनाचा वाचक अर्थ काढतो. त्या अर्थ काढण्याला तसा विरोध नाही. पण, काही जण आपल्या लेखनाने सुखावतात तर काही प्रचंड नाराज होतात त्यांना वाटतं हे याने आपल्या बद्दलच लिहिलं आहे. आपण प्रेम कविता अथवा विरह कविता लिहिली तर ही कविता तुम्ही माझ्यावरच लिहिली आहे असे मला माझ्या अनेक ज्येष्ठ मैत्रिणी नेहमीच बोलतात आणि आर्टिकल बद्दल सुद्धा असाच अनुभव येतो. विरह कविता लिहिली तर सर तुमचा ब्रेकअप झाला का असं थेट विसरतात आणि प्रेमाबद्दल लिहिलं तर सर कोण आहे हो ती असं ही थेट विचारतात.
आणि माझ्या लेखनाची शैली तिरकी असल्याने तर काही लोक थेट माझ्या जीवावरच उठतात. तुम्ही हे आम्हालाच उद्देशून लिहिलं आहे असं समजून माझ्यावर नाराज होतात. आता सुज्ञ वाचक मंडळींनो तुम्हीच सांगा कुठलाही लेखक कवी जे जे काही लिहितो ते थोड्याफार फरकाने लोकांच्या आणि आपल्या आयुष्यात घडलेले असते. आता हा लेखक काय संगळ्यांना प्रत्यक्ष ओळखत नसतो. तो जे समोर दिसतंय ते लिहीत असतो. याला निव्वळ योगायोग समजण्याचे सोडून लोकांना हा आमच्यावरच लिहितो असा भ्रम होतो. आता तुम्हीच सांगा याला काय वाटेल, त्याला काय वाटेल याचा सतत विचार करीत बसलं तर लेखकाला आपली लेखणी कायमची म्यान करून ठेवावी लागेल, बरोबर ना.. तात्पर्य काय तर काही लोक लेखकाला त्याने लिहिलं तरी का लिहिलं आणि नाही लिहिलं तरी हा इतका गप्प का बसलाय असं कात्रीत पकडू पाहतात.. आता तुम्हीच सांगा तुम्हाला काय वाटतं लेखक कवींनी काय करावं अशा संशयी लोकांचं..??
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.