प्रेम व्यक्त करायला आज लोकांना विशिष्ट डे लागतो हे पाहून हसावं की रडावं हेच कळत नाही. अहो प्रेम व्यक्त करायला जर तुम्हाला एखादा दिवस लागत असेल आणि त्या समोरच्याला अथवा समोरचीला तुमचं प्रेम व्यक्त केल्यावरच कळणार असेल तर ते प्रेम प्रेम नाहीच हे आमचं स्पष्ट मत आहे. इतका काळ एकमेकांसोबत राहून सुद्धा जर आपल्या सोबत्याचं मन आणि त्याचं प्रेम कळत नसेल तर तुम्ही दगड अहात, तुम्ही माठ अहात आणि तुम्ही कधीच कुणाच्याच भावना न समजू शकणाऱ्या आत्मकेंद्री व्यक्ती अहात हे सिद्ध होते. प्रेमाला उपमा नाही, प्रेमाला जात नाही, प्रेमाला रंग रूप गरीब श्रीमंत असा भेदभाव नाही, प्रेमात तुमचा देश आणि तुम्ही वयाने लहान की मोठे या गोष्टी अजिबात मॅटर करीत नाही. प्रेमात एकमेकांना काहीही झालं तरी समजून घेणं आणि एकमेकांसाठी दुनियेशी लढायला तयार राहणं आणि एखादा चुकला तरी त्याला समजावून माफ करण्या इतकं मनाचं मोठेपण हवं. पण, हे मोठेपण अंगी असायला सुद्धा तम्ही प्रगल्भ विचारांचे आणि तुमचं मन विशाल आकाशा एवढं आणि खोल समुद्रा एवढं असायला हवं.. मान दिला तर तो घेता येण्या एवढं मोठं व्हा हो. काही गोष्टी पटो न पटो पण आपल्या माणसासाठी करायच्या असतात. प्रत्येकवेळी स्वतःचा आनंद आणि सुख आणि मोठेपणा बघण्या ऐवजी कधी तरी तुमच्यावर जीव असणाऱ्याचं मन सुद्धा जपायला शिका हो..
आणि खरं तर हे डे वगैरे सगळं झूट आहे हो. हल्ली सगळं फॅड निघालंय हो.. पेरेंट्स डे, रोज डे, वूमन्स डे, फ्रेंड्स डे, नर्स डे, डॉक्टर डे, डॉटर डे.. इत्यादी इत्यादी आणि इत्यादी डे..... कधी तरी भाकर डे सुद्धा असुद्या ना.. आणि आई वडील, मुलगी, बहीण भाऊ यांच्यासाठी आपल्याला डे ची गरजच नाही हो.. आई वडील देवापेक्षा मोठे आहेत आपल्यासाठी, त्यांचा मान आयुष्यभर राखायलाच हवा. आणि त्याच बरोबर इतर सर्व नाती जपता जोपासता यायला हवीत. फक्त एका दिवसापुरती नसतात हो नाती.. नातं कुठलंही असो ते जोपासणं आपल्या हाती आहे. आपण फक्त समोरच्यां कडूनच अपेक्षा करीत रहायचं. पण, त्या समोरच्याची अपेक्षा पूर्ण करण्याची वेळ आली की आपण गुपचूप पळून जायचं. याला नातं बोलत नाही आणि हे प्रेम सुद्धा खचितच नाही हो.. प्रेम करायचं तर छातीठोकपणे करा तुमच्या पळपुटेपणामुळे प्रेमाला बदनाम करू नका. प्रेम म्हणजे अश्लीलता नाही हे आधी लक्षात घ्या. व्यभिचार करणाऱ्यांना प्रेम म्हणतच नाही. प्रेम ही खूप कोमल भावना आहे. तुमच्यावर प्रेम करणाऱ्या माणसाशी, घरातल्यांशी, मित्र मैत्रिणींशी, समाजात रोज माणसासारखे वागा म्हणजे मग तुमच्या भावना व्यक्त करायला अशा कुठल्या डे ची गरजच लागणार नाही.. पटतंय ना..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.