अगदी काहीही झालं इतर चित्ती समाधान आणि प्रसन्न असायला हवे. आपल्या संतांनी सुद्धा हेच सांगितले आहे. प्रत्येकाचा जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. काही लोक सर्वकाही जवळ असूनही सतत कण्हत कुथत असतात. सतत काही ना काही तक्रारीच करीत असतात. अशा लोकांना शंभर कोटी रुपये जरी दिले तरी हे लोक रडतच राहतील. या स्वरूपाचे लोक संकुचित मनोवृत्तीचे असतात, हे लोक सतत स्वतःची तुलना इतरांशी करीत राहतात. याच्याकडे एवढे आहे आणि माझ्याकडे हे नाही असं सतत नकारात्मक दळण दळण्याची या लोकांना सवय असते. इतरांवर जळणे हे या लोकांच्या रक्तातच असते. यांना काहीही सांगा हे लोक त्यात थोडी तरी चूक काढतातच. मनमोकळेपणाने वागणे यांच्या स्वभावातच नसते. मोठ्या मनाने एखाद्याची प्रशंसा करणे यांना जमत नाही. हे लोक फक्त स्वतः गाजण्याचा विचार करतात. म्हणून अशा नकारात्मक प्रवृत्तीच्या लोकांच्या संपर्कात आपण राहता कामा नये..
विधायक आणि मनमोकळ्या बिनधास्त स्वभावाचे लोक यांच्याकडे जरी पैसे कमी असतील, रोजच्या जगण्यात अडी अडचणी असतील तरी त्याचा बाऊ करीत नाहीत. हे लोक लढाऊ असतात. काहीही झालं तरी शेवटच्या श्वासापर्यंत लढणे यांच्या रक्तात असते. हे लोक दिलदार असतात. स्वतः प्रॉब्लेम मध्ये असूनही हे लोक इतरांना जमेल तशी मदत करीत राहतात. जीवनाचा ग्लास अर्धा रिकामा झाला आहे असे रडत न बसता ग्लास अजूनही अर्धा भरलेला आहे, आपण त्यात उरलेले जीवन आनंदाने जगू शकतो असा यांचा दृढ विश्वास असतो. हे लोक कुणावर जळत नाहीत. जगण्याचा सोहळा एखाद्या सणाप्रमाणे आनंदाने हे लोक सतत जगत असतात. पुन्हा आयुष्य आहे की नाही या गोष्टीवर यांचा मुळीच विश्वास नसतो म्हणून हे लोक जे आयुष्य हातात आहे त्यातच आनंद घेतात आणि इतरांनाही आनंद देतात. आज अशी लोकं खूप दुर्मिळ होत चालली आहेत. जर तुमच्या जवळ तुम्हाला प्रोत्साहन देणारी अशी माणसं असतीत तर त्यांना तळहातावरच्या फोडा प्रमाणे जपा. कारण या स्वार्थी दुनियेत माझंही माझं आणि तुझंही माझंच म्हणणाऱ्यांच्या मांदियाळीत हे लोक फारच वेगळे असतात. म्हणूनच आम्ही नेहमी म्हणतो ना की जगणे ही एक कला आहे.. प्रत्येकालाच ते जमते असे नाही..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.