तोंड दाबलेले पत्रकार, जुलमी राज्यकर्ते, न्यायाच्या शोधात न्यायालये आणि मुकी बिचारी जनता..

आपल्या भारताची सध्याची परिस्थिती पाहता आपली प्रगती झाली आहे असे म्हणणे शंभर टक्के खरे नाही.. खूप अंशी ही प्रगतीची सूज आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. कुणी कितीही नाकारले तरी अगदी रोखठोक बोलायचे झाल्यास काही मंडळी लोकशाहीला गुंडाळून झपाट्याने देशाला एककल्ली हुकूमशाहीकडे घेऊन चालली आहे. आम्ही कुठल्याच राजकीय पक्षाची बाजू घेत नाही आणि आम्हाला त्याची गरजही वाटत नाही. पण, इंदिरा गांधी असतांना काँग्रेसने आणीबाणी आणल्या नंतर काँग्रेसला सत्ता गमवावी लागली होती हे आताच्या राज्यकर्त्यांनी विसरू नये. आणीबाणीच्या काळात लिहिण्या बोलण्यावर बंधने घातली होती आणि इंदिराबाई विरोधात बोलणाऱ्यांना जेल मध्ये टाकले जात होते. त्यावेळी संपादक संपादकीय कॉलमची चौकट एकही शब्द न लिहिता रिकामी ठेवत होते आणि हे न लिहिलेले शब्दच खूप बोलत होते. आणि जे लिहीत होते ते सरळ तुरुंगात डांबले जात होते. 

आजही पत्रकार पूर्णपणे दाबले गेले आहेत, त्यांची मुस्कटदाबी केली जात आहे. जे माध्यम सरकार विरोधी बोलेल त्याच्यावर केसेस टाकल्या जात आहेत किंवा त्यांचे परवाने रद्द केले जात आहेत. घटनेचे, लोकशाहीचे आणि लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे म्हणजेच पत्रकारांचे बारा वाजवले जात आहेत. पण दुर्दैवाने या विरोधात फार कमी पत्रकार आवाज उठविताना दिसत आहे. काँग्रेसला मनमानी कारभार करतात असा आरोप करणारे जर काँग्रेस खरंच अशी असती तर साम, दाम, दंड, भेद वापरून त्यांनी भाजपाला सत्तेवर येऊच दिले नसते. पण आजही काँग्रेस इंदिरा गांधींच्या आणीबाणी प्रकरणातून धडा घेऊन लोकशाहीचा हात घट्ट धरून आहे. न्यायालये, पोलीस यंत्रणा या सर्वांवरच दबाव आणला जात असल्याची जनमानसांत उघड चर्चा आहे. काहीही झाले तरी लोकशाही, घटना शाबूत रहायलाच हवी. आणि मोकळ्या वातावरणात आणि निःपक्षपातीपणे निवडणुका व्हायला हव्यात.

जगातल्या कुठल्याच देशात आणि लोकशाहीत फक्त एकच पक्ष असू नये. देश आपल्या सारख्या सर्वसामान्य लोकांचा आहे. देश हुकूमशहा बनू पाहणाऱ्यांचा नाही. अडाणी, अंबानीला देश विकून सर्वसामान्यांचे बारा वाजवायला जे कुणी निघालेले आहेत त्यांना जनताच योग्य तो धडा शिकवेल. पण यात भरडली जातेय ती गरीब बिचारी जनता. आता पुन्हा आपल्याच देशात सर्वसामान्यांच्या मूलभूत गरजांसाठी बंड पुकारावे लागणार की काय ?? शोकांतिका आहे. गरीब आणखी गरीब होत चाललाय आणि पैसेवाले आणखी पैसेवाले होत आहेत. हे कुठेतरी थांबायलाच हवे आणि माध्यमांबरोबरच सर्वसामान्य जनतेनेही आपल्यावर अन्याय होत असेल तर तिथे बिनधास्तपणे आवाज उठवायला हवा. आणि जर असे केले नाही तर आपण आपल्याच देशात पुन्हा गुलाम होऊ..

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

16

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2024. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.