रेल्वे प्लॅटफॉर्मवरचा बेंच.. अत्यंत गर्दीत जगणारी मुंबई आणि बरंच काही..

स्वप्नं पूर्ण करणारी मुंबापुरी म्हणून मुंबईकडे पाहिलं जातं. पोटात भूक आणि डोळ्यात शेकडो स्वप्नं घेऊन इथे देशभरातून हजारो लोकांचे तांडे रोज येत असतात. शहराला आता हात पाय पसरायला देखील जागा उरलेली नसल्याने मुंबईची उपमुंबई अशी अनेक शहरं सध्या नव्याने वसू लागली आहेत..

शहरासाठी आवश्यक असणारी वीज, पाणी, निवारा, आरोग्य, सुरक्षा, वाहतूक, शिक्षण, रोजगार आणि जगण्याची लढाई इथे सरावलेला प्रत्येकजण आपापल्या परीने लढत आहे. यात कुणी यशस्वी होतो तर कुणी अयशस्वी. तरी ही मुंबई अगदी सगळ्यांना आपल्या पोटात घेऊन जगते आणि जगविते आहे.  इथे स्वप्नं विकली आणि खरेदी केली जातात.. इथली लाईफ लाईन म्हणजे टाटांची बेस्ट बस आणि केंद्रसरकारच्या अखत्यारीत असलेली गोर गरिबांची रेल्वे.. लाखो लोक रोज सकाळी रेल्वे आणि बेस्टच्या बसेसने पोटापाण्यासाठी घरापासून दूरवर प्रवास करतात. कामाला जातात आणि पुन्हा संध्याकाळी, रात्री घरी येतात. विद्यार्थ्यांची सुद्धा हीच अवस्था असते बरे.. कधी अगदी सिरियसली तुम्ही रेल्वे प्लॅटफॉर्मचे निरीक्षण करा. मी नेहमीच असे निरीक्षण करीत असतो. येथील बेंचला म्हंणजेच बाकड्यांना जर बोलता आले असते तर त्यांनी येथे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची कैफियत नक्कीच मांडली असती.. रोज चेहऱ्यावर वेगवेगळे भाव आनंद, दुःख घेऊन इथे लाखो लोक जीवाची आणि गर्दीची पर्वा न करता पोटासाठी प्रवास करीत असतात. संध्याकाळी प्लॅटफॉर्मवर उतरल्यावर या लोकांच्या चेहऱ्यावर सुटलो बाबा एकदाचा असा भाव असतो. महिलावर्ग आता रात्री काय जेवण बनवायचं या चिंतेत घराकडे निघतात..

काही लोक याला मुंबई आणि मुंबईकरांचं स्पिरिट म्हणतात तर मी याला मुंबईकरांची मजबुरी अथवा आगतिकता म्हणतो. काठावरून मुंबई बघणाऱ्याला अथवा गावाकडे आणि परराज्यांत राहणाऱ्यांना मुंबई जेवढी आकर्षक वाटते तेवढी ती प्रत्यक्षात असली तरी इथे पाय घट्ट रोवून उभे राहणे हे लोक समजतात इतके कधीच सोपे नाही. अगदी प्रचंड संघर्ष करावा लागतो बरे मुंबईमध्ये.. फिरायला अथवा काही दिवस रहायला, उच्च शिक्षणासाठी आणि हॉस्पिटल मधल्या इलाजासाठी मुंबई ठीक आहे हो, अथवा ज्याला गावाकडे काहीच पर्याय नाही त्याच्या पोटापाण्यासाठी सुद्धा मुंबई ठीक आहे. पण, ज्याच्या गावी सगळं व्यवस्थित आहे त्याने मुंबईला येऊन इथल्या प्रदूषण आणि धावपळीच्या जगण्यात आपल्या आयुष्याची पाच वर्ष मुळीच कमी करू नयेत असे माझे स्पष्ट मत आहे. आणि येथे अगदी सगळ्याच गोष्टींसाठी लांबच लांब लागलेल्या रांगा आणि कधी चुकून रात्री अपरात्री रेल्वे प्लॅटफॉर्मवर रिकामा असलेला अथवा लोकांनी टंच भरलेला बेंच, रेल्वेची फोर्थ सीट अथवा चुकून नशिबाने भेटलीच तर विंडो सीट न बोलताही तुम्हाला खूप काही सांगून जाईल.. जिना इसिका नाम है.. आणि यालाच तर मुंबई म्हणतात..

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

12

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.