भारतीयांनी १.१ लाख कोटी तास घालवले मोबाइलमध्ये..

सध्या रस्त्यात चालताना, मेट्रो, बस, लोकल, रेस्टॉरंट, विमानतळ, विमान, बगीचात बसलेले असताना जिकडे तिकडे एकच दृश्य दिसते ते म्हणजे प्रत्येक जण मोबाइलमध्ये डोकं खुपसून बसलेला आहे..

नवी दिल्ली : सध्या रस्त्यात चालताना, मेट्रो, बस, लोकल, रेस्टॉरंट, विमानतळ, विमान, बगीचात बसलेले असताना जिकडे तिकडे एकच दृश्य दिसते ते म्हणजे प्रत्येक जण मोबाइलमध्ये डोकं खुपसून बसलेला आहे. आपल्या आजूबाजूला काय चालले आहे याचेही बऱ्याच जणांना भानही नसते. भारतीयांच्या या मोबाइलवेडाचा अभ्यास केला असता २०२४ मध्ये भारतीयांनी १.१ लाख कोटी तास मोबाइल पाहण्यात घालवल्याचे उघड झाले आहे. सोशल मीडिया, गेम, व्हिडीओ आणि डिजिटल वाहिन्यांवर भारतीयांनी सर्वाधिक वेळ घालवल्याचे स्पष्ट झाले आहे.

भारतात इंटरनेट वापराचा वेग वाढला आहे. त्यातही स्मार्टफोन ‘ईएमआय’वर उपलब्ध झाल्याने शहरांपासून गावांपर्यंत मोबाइलची विक्री वाढलेली आहे आणि प्रत्येक जण मोबाइलमध्ये डोकं खुपसून बसलेला दिसतो. त्यामुळे भारतीयांनी २०२४ मध्ये वर्षभरात सामूहिकरीत्या १.१ लाख कोटी तास मोबाइलवर घालवले, असे ‘ईवाय’च्या अहवालात नमूद केले आहे.

स्वस्त दरात इंटरनेट उपलब्ध असल्याने इन्स्टाग्राम, फेसबुकपासून नेटफ्लिक्सवर भारतातील लोक वेळ घालवत असतात. प्रत्येक भारतीय रोज ५ तास मोबाइल पाहण्यात वेळ घालवतो. तसेच मोबाइलमध्ये ७० टक्के वेळ हा सोशल मीडियावर, गेमिंग व व्हिडीओ पाहण्यात जातो. भारतातील डिजिटल वाहिन्यांची उलाढाल ही २.५ लाख कोटी रुपयांवर पोहचली असून तिने टीव्ही उद्योगाला पहिल्यांदाच मागे टाकले आहे, असे अहवालात म्हटले आहे.

मोबाइलवर अधिक काळ लोक व्यतित करत असल्याने उद्योगांनीही ग्राहकांशी स्वत:ला जोडून घेण्यासाठी या माध्यमाचा वापर सुरू केला आहे. मोठमोठे होर्डिंग्ज, टीव्हीवरील जाहिरातींऐवजी डिजिटल जाहिरातींवर कंपन्यांनी खर्च सुरू केला आहे, असे या क्षेत्रातील तज्ज्ञाने सांगितले.

भारतीय लोक मोठ्या प्रमाणावर स्मार्टफोन पाहत असल्याने रील्स व व्हिडीओ तयार करण्याचे पीक भारतात आले आहे. स्वत:चा दिनक्रम दाखवण्यापासून आफ्रिकेच्या जंगलाची सैर हे कंटेट निर्माते लोकांना दाखवतात. भारतात स्वस्तात इंटरनेट असल्याने तरुण मुले रील्स किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकतात. भारताने सोशल मीडियाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन यासाठी १ अब्ज डॉलरचा निधी तयार केला आहे.

डेटा खप वाढला

भारत हा डेटा खप वाढण्यात जगात अग्रेसर देश आहे. देशातील नागरिकांचा दरमहा डेटा खप सप्टेंबर २०२५ पर्यंत २१.२ जीबी पोहचणार आहे, तर ‘५-जी’ डेटाचा दरमहाचा खप दरमहा ४० जीबीवर पोहचला आहे, असे नोकियाने म्हटले आहे. येत्या तीन वर्षांत देशाच्या १४० कोटी लोकसंख्येत ७७ कोटी जण ‘५-जी’ वापरकर्ते असतील, असे मोबाइल ब्रॉडबँड इंडेक्समध्ये म्हटले आहे.

कंटेंट क्रिएटर्सची चांदी

भारतात कंटेंट क्रिएटर्स व सोशल मीडिया इन्फ्लूएंझर्सची बाजारपेठ वाढली आहे. त्यामुळे कॉर्पोरेट मार्केटिंग धोरणात त्यांना स्थान मिळू लागले आहे. कारण साधा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर तत्काळ विक्रीला चालना मिळते. मोठे उद्योग, चित्रपट निर्माते, राजकीय पक्षांनी या मोबाइलप्रेमींचे लक्ष वेधण्यासाठी मोहिमा सुरू केल्या आहेत. कंटेंट क्रिएटर हे केवळ मनोरंजनासाठी राहिलेले नाही, तर लोकांनी काय घ्यावे, कुठे खरेदी करावे हेही कंटेंट क्रिएटर ठरवू लागले आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

12

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.