राज्याच्या विविध भागात गेले दोन-तीन दिवस अवकाळी पावसाने थैमान घातले असून अवेळी आलेल्या पावसामुळे शेतकरी, बागायतदार रडकुंडीला आले आहेत. पाऊस व गारपिटीमुळे एका रात्रीत शेतातील उभे पीक आडवे झाले आहे..
मुंबई/पुणे : राज्याच्या विविध भागात गेले दोन-तीन दिवस अवकाळी पावसाने थैमान घातले असून अवेळी आलेल्या पावसामुळे शेतकरी, बागायतदार रडकुंडीला आले आहेत. पाऊस व गारपिटीमुळे एका रात्रीत शेतातील उभे पीक आडवे झाले आहे. कोकण, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील शेतकऱ्यांच्या आंबा, द्राक्ष, सफरचंद, पपई आदी फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचसोबत लिंबू, कांदा, मका या पिकांचीही हानी झाली आहे.
सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात मध्यरात्री विजेच्या गडगडाटासह कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे तयार झालेला आंबा, काजूचे मोठे नुकसान झाले. याचा मोठा फटका आंबा बागायतदारांना बसला आहे. तसेच अनेक ठिकाणी झाडे कोसळली आहेत.
विदर्भात वादळी पाऊस
विदर्भात अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. ढगाळ वातावरण व पावसामुळे २४ तासांत कमाल तापमानात ९ ते १० अंशांची घसरण झाली आहे. नागपूर जिल्ह्यात ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहत आहेत.
कमी दाबाचा पट्टा
भारतीय हवामानशास्त्र विभागाचे तज्ज्ञ एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठवाडा आणि लगतच्या मध्य महाराष्ट्रावरील उष्णकटिबंधीय पातळीवर चक्राकार स्थिती निर्माण झाली आहे. तसेच पूर्वेकडील वाऱ्यांमुळे दक्षिण कर्नाटक ते नैऋत्य मध्य प्रदेशापर्यंत मराठवाड्यावर एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या प्रणालींच्या प्रभावामुळे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे राज्यावर येत आहेत. दिवसाचे तापमान अधिक असल्याने या बाष्पामुळे मोठे ढग तयार होत आहेत. त्यामुळे दुपारनंतर मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होऊन हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे.
आजही पावसाची शक्यता
कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी शुक्रवारी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होऊन हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. कोकणात ९ एप्रिलपर्यंत ही स्थिती कायम राहणार असून राज्याच्या अन्य भागात मात्र आकाश निरभ्र राहून कमाल तापमानात २ ते ४ अंशांची वाढ होण्याचा अंदाज आहे.
रत्नागिरीत पावसाची जोरदार हजेरी
गेले दोन ते तीन दिवस हवामान खात्याने रत्नागिरी जिल्ह्याला यलो अलर्ट दिला असून रत्नागिरी शहरात गुरुवारी पहाटे तीन वाजण्याचा सुमारास अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांसह आंबा बागायतदार चिंताग्रस्त झाले आहेत. रत्नागिरी शहरात पडणाऱ्या पावसामुळे विद्युत पुरवठा काही काळापुरता खंडित करण्यात आला होता. दरम्यान, रत्नागिरीसह संगमेश्वर, साखरपा, देवरूख, राजापूर आदी ठिकाणीही जोरदार पावसाने हजेरी लावली.
पुण्यात जोरधार
पुणे शहरासह उपनगरांमध्ये आणि जिल्ह्यातील काही भागांमध्ये गुरुवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे तीन ते चार दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळाला. या पावसामुळे कामानिमित्त घराबाहेर असलेल्या लोकांची मात्र त्रेधातिरपिट उडाली. पुण्यातील शिवाजीनगर, बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, सदाशिव पेठ भागात पाऊस सुरू आहे. त्याचबरोबर औंध, सांगवी बाणेर, पाषाण या उपनगरांमध्येही ढगांच्या गडगडाटासह पाऊस कोसळला.
Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.