एखाद्याचे वाहन जुने झल्यास स्वेच्छेने वाहन मोडीत काढल्यास त्याच प्रकारातील नवीन वाहन खरेदीत तब्बल १५ टक्के सवलत मिळणार आहे..
मुंबई : एखाद्याचे वाहन जुने झल्यास स्वेच्छेने वाहन मोडीत काढल्यास त्याच प्रकारातील नवीन वाहन खरेदीत तब्बल १५ टक्के सवलत मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मंजुरी देण्यात आली आहे.
नोंदणीकृत वाहन निष्कासन केंद्रावर (आरव्हीएसएफ) परिवहन प्रकारातील वाहनांना नोंदणीपासून ८ वर्षांच्या आत वाहन स्वेच्छेने मोडीत काढल्यास तसेच परिवहनेतर प्रकारातील वाहनांना नोंदणी पासून १५ वर्षांच्या आत स्वेच्छेने मोडीत काढल्यास १० टक्क्यांची कर सवलत दिली जात होत होती. परंतु यापुढे एकरकमी कर लागू असणाऱ्या परिवहन तसेच परिवहनेतर वाहनांना कराच्या १५ टक्के सवलत दिली जाणार आहे. तर ज्या वाहनांना वार्षिक कर लागू आहे, अशा परिवहन प्रकारातील वाहनाच्या नोंदणी दिनांकापासून पुढील ८ वर्षांपर्यंत तर परिवहनेतर प्रकारातील वाहनांसाठी पुढील १५ वर्षांपर्यंत वार्षिक करात १५ टक्के सवलत देण्यात येणार आहे.
नोंदणीकृत केंद्रावर वाहन मोडीत काढल्यानंतर वाहन धारकास मिळालेले ठेव प्रमाणपत्र कर सवलतीसाठी पुढील दोन वर्षे वैध राहणार आहे. जे मोटार वाहन मोडीत काढलेले असेल, त्याच प्रकारच्या वाहनांच्या खरेदीवर ही कर सवलत लागू होईल. अधिसूचना जाहीर झाल्यापासून तीन वर्षांच्या आत असे वाहन स्वेच्छेने मोडीत काढल्यास ही कर सवलत मिळणार आहे.
Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.