राज्यातील शेतकरी, घरकुल लाभार्थी आणि शासकीय बांधकामांसाठी शेततळी, पाझर तलाव, महसुली नाले आणि बंधाऱ्यांमधून निघणारा गाळ, माती, मुरूम आणि दगड विनामूल्य मिळणार आहे..
मुंबई : राज्यातील शेतकरी, घरकुल लाभार्थी आणि शासकीय बांधकामांसाठी शेततळी, पाझर तलाव, महसुली नाले आणि बंधाऱ्यांमधून निघणारा गाळ, माती, मुरूम आणि दगड विनामूल्य मिळणार आहे. या निर्णयामुळे शेत रस्ते सुधारण्यासाठी लागणारा मुरूम आणि माती शेतकऱ्यांना सहज उपलब्ध होईल, ज्यामुळे शेतीला जोडणारे रस्ते मजबूत होतील.
शेतकऱ्याला शेतापर्यंत पोहचण्यासह कृषी यंत्रसामग्री सहज वाहून नेता आली पाहिजे यासाठी पाणंद रस्ते अत्यंत महत्त्वाचे असतात. मात्र, अनेक ठिकाणी पाणंद रस्त्यांची अवस्था खराब असून, त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीत जाण्यास अडचणी येतात. याच पार्श्वभूमीवर सरकारने ‘मातोश्री ग्राम समृद्धी पाणंद रस्ते योजना’ प्रभावीपणे राबवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय गुरुवारी जारी करण्यात आला. याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
पाणंद रस्त्यांच्या विकासाला बळकटी
शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतांमध्ये जाण्यासाठी सोपा मार्ग उपलब्ध होणार असून, शेतीचे उत्पादन आणि कार्यक्षमता वाढणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण बळकट होईल आणि गावांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल. हा निर्णय शेतकरी, ग्रामपंचायती आणि संपूर्ण कृषी क्षेत्रासाठी दिलासा देणारा ठरणार आहे.
महामार्गाएवढे शेत रस्त्यांचा विकास व्हावा
महामार्गाप्रमाणेच शेत रस्त्यांच्या विकासालाही तितकेच महत्त्व दिले पाहिजे. शेतापर्यंत रस्ता असल्यास शेतमाल वाहतूक करणे सोपे होते आणि शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या अवजड यंत्र सामग्रीचा वापरही सहज शक्य होतो.
Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.