गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्य सरकारने वीजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या १ एप्रिलपासून पुढील पाच वर्षे स्वस्त दरात वीज मिळणार आहे..
मुंबई : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्य सरकारने वीजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या १ एप्रिलपासून पुढील पाच वर्षे स्वस्त दरात वीज मिळणार आहे. त्यामुळे वाढत्या वीजदरांमुळे त्रस्त झालेल्या राज्यातील घरगुती, औद्योगिक, वाणिज्यिक वीज ग्राहकांना या निर्णयामुळे आता मोठा दिलासा मिळणार आहे. महावितरण कंपनीने महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे वीजदर कपातीचा प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावावर सुनावण्या झाल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने वीजदर निश्चितीचे आदेश शुक्रवारी मध्यरात्री जारी केले.
स्मार्ट मीटर (टीओडी) बसविणाऱ्या औद्योगिक, वाणिज्यिक ग्राहकांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ तसेच रात्री १२ ते सकाळी ६ वाजेपर्यंतच्या वीज वापरास १० ते ३० टक्के वीजदर सवलत मिळेल, मात्र सायंकाळी ५ ते रात्री १०-१२ वाजेपर्यंतच्या वीज वापरासाठी २० टक्के जादा मोजावे लागतील. महावितरण व अदानी कंपनीचे वीजदर १ एप्रिलपासून सरासरी १० टक्के, टाटा कंपनीचे १८ टक्के तर बेस्टचा वीजदर ९.८२ टक्क्यांनी कमी होतील. पुढील पाच वर्षांत अपारंपरिक क्षेत्रातील सौर व अन्य स्वस्त वीज उपलब्ध होणार असल्याने वीजदर कमी होणार आहेत.
महाराष्ट्र राज्य वीज नियमक आयोगाने रात्री उशिरा जारी केलेल्या आदेशानुसार २०२५-२६ या वर्षासाठी वीजदरामध्ये सुमारे १० टक्के कपात होणार आहे. नवे वीजदर १ एप्रिलपासून लागू होणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे महायुती सरकारने विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान वीजदर कमी करण्याबाबतच्या घोषणा केल्या होत्या. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर करत असताना येत्या ५ वर्षांत महाराष्ट्रात विजेचे दर कमी होणार असल्याबाबतची घोषणा केली होती.
मुंबईकरांसाठी मात्र हा निर्णय फारसा प्रभावी ठरण्याची शक्यता नाही. मुंबईत वीजपुरवठा करणाऱ्या बेस्ट आणि टाटा पॉवर या कंपन्या चेंबूरच्या वीजनिर्मिती केंद्रातून वीज घेतात, जी तुलनेने महाग आहे. मुंबईतील ग्राहकांना स्वस्त दरात वीज मिळवून द्यायची असेल, तर बाहेरून कमी किमतीत वीज खरेदी करावी लागेल. मात्र, सध्या मुंबईत वीज वाहून आणणाऱ्या वाहिन्यांची क्षमता पूर्ण झालेली असल्याने अतिरिक्त वीज आणणे शक्य नाही. जोपर्यंत या वाहिन्यांची क्षमता वाढवली जात नाही, तोपर्यंत मुंबईतील वीजदर कमी होण्याची शक्यता नाही, असे वीजतज्ज्ञ अशोक पेंडसे यांनी स्पष्ट केले आहे.
स्मार्ट मीटरसाठी दिवसा सवलत
राज्यातील कृषी वगळता सर्व वीज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर (टीओडी) टप्प्याटप्प्याने बसविण्यात येणार असून औद्योगिक व वाणिज्यिक ग्राहकांसाठी प्राधान्य राहील. हे मीटर बसविणाऱ्या ग्राहकांसाठी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या सौरऊर्जा निर्मितीच्या काळातील वीज वापरासाठी प्रतियुनिट ८० पैसे ते एक रुपया सवलत मिळेल. स्मार्ट मीटर बसविणाऱ्या औद्योगिक व वाणिज्यिक ग्राहकांना रात्री १२ ते सकाळी ६, सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत १० ते ३० टक्के वीजदर सवलत मिळेल. मात्र सायंकाळी ५ ते रात्री १०-१२ या वेळेतील वीज वापरासाठी २० टक्के वीज आकार अधिक राहील.
Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.