महाराष्ट्र राज्य विधानसभा २०२४ सध्या जबरदस्त दावे - प्रतिदाव्यांच्या सापशिडीवरून वरखाली जात आहे. निवडणुकांचे अंदाज वर्तविणारे तज्ज्ञ रोज नव नवा अंदाज वर्तवित आहेत. या अंदाजात कधी भाजप पुढे असतो तर कधी काँग्रेस पुढे असते. महाराष्ट्रात पुन्हा जर भाजप आणि एकनाथ शिंदे, अजित पवार तथा त्याच्या मित्रपक्षांचे सरकार आले तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार की एकनाथ शिंदे या चर्चा सुद्धा रंगात आल्या आहेत. दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीने मुख्यमंत्रीपदासाठी जयंत पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब केला असला तरी ज्याची सीट जास्त त्यांचा मुख्यमंत्री अशी सावध भूमिका शरद पवारांनी घेतलेली आहे. या सर्वप्रकारात काँग्रेस बरेच आमदार निवडून आणेल असे म्हटल्यास वावगे ठरू नये. यावेळी अगदी सगळ्याच बाबतीत कधी नव्हे इतकी ही निवडणूक अटीतटीची झाल्याचे समोर येत आहे.
अमित शहा यांनी दोन ते तीन वेळा भाजप आणि मित्रपक्षाचे सरकार येईल व फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद मिळेल अशी हिंट दिलेली आहे. पण राजकारणात खायचे आणि दाखवायचे दात वेगवेगळे असतात त्यामुळे नक्की काय होईल हे प्रत्यक्ष वेळ आल्यावरच कळेल. काही राजकीय नेते मुद्दाम काहीबाही भाष्य करून पक्षा पक्षांमध्ये कलगीतुरा लावून देण्याचा प्रयत्न करीत आहेत. तर काही माध्यमं ज्यांचे पाचही आमदार निवडून येणार नाहीत अशा लोकांना डोक्यावर घेऊन त्यांच्या मुलाखती घेत आहेत.
सांगायचा मुद्दा हा आहे की सरकार कुणाचे ही येऊदेत त्याने गरिबांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यावर भर द्यावा एव्हडीच अपेक्षा आहे. व्यक्तिगत ज्याचे काम चांगले आहे मग तो कुठल्याही पक्षाचा असेना त्यालाच लोक मत देतील हेही या वेळेस घडणार आहे. मतदार हुशार झाले आहेत ते भावनिक दृष्ट्या फसविणाऱ्या लोकांना भाव देणार नाहीत हेही या वेळी निश्चितपणे घडेल. लोकांनी बुधवार २० नोव्हेंबर २०२४ रोजी घराबाहेर पडून मतदान करावे असे आम्ही आवाहन करीत आहोत.. त्यानंतरच्या तीन दिवसांतच कोण किती पाण्यात आहे हे मतमोजणीवरून अवघ्या जगाला कळेलच तो पर्यंत दावे प्रतिदावे आणि अंदाजांच्या सापशिडीवरून अगदी सगळ्यांनाच वरखाली जावं लागणार आहे..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग..
Shabda Khadag © 2024. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.