मुंबई : गेला महिनाभर विधानसभा निवडणुकीसाठी सुरू असलेल्या झंझावाती प्रचारानंतर आता बुधवारी मतदान होणार असून, एक दिवसाचा ‘राजा’ असलेला मतदारराजा रथीमहारथींचे भवितव्य निश्चित करणार आहे. राज्यात गेली अडीच वर्षे सुरू असलेला गलिच्छ राजकारणाचा चिखल साफ करण्याची मोठी जबाबदारी मतदारराजावर आहे. त्यामुळे यावेळी मतदान करताना मतदारांची कसोटी लागणार आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी बुधवारी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर एकूण १५८ पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यापैकी ६ मोठे पक्ष दोन आघाड्यांचा भाग म्हणून निवडणूक लढवत आहेत.
राज्यातील २८८ मतदारसंघांत तब्बल ४,१३६ उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत. यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांची अस्तित्वाची लढाई सुरू आहे. राज्यातील ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदार आपला मतदानाचा हक्क बुधवारी बजावणार आहेत. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर शनिवार, २३ नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असून कोण बाजी मारणार हे स्पष्ट होणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने १५ ऑक्टोबर रोजी राज्यातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर गेला महिनाभर सर्वपक्षीय नेत्यांनी राज्यात प्रचाराचा धडाका लावला होता. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीत दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी, काँग्रेस व भाजप या सहा मुख्य पक्षांसह विविध राजकीय पक्षांचे उमेदवार निवडणुकीत उतरले आहेत. उमेदवारी न मिळाल्याने सर्वपक्षीय नाराजांनी बंडाचे हत्यार उपसत बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यातील काही बंडखोरांचे भवितव्यही या निवडणुकीत ठरणार आहे.
Shabda Khadag © 2024. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.