राज्यात ‘ई-बाइक टॅक्सी’ला परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले..
मुंबई : राज्यात ‘ई-बाइक टॅक्सी’ला परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतच्या ‘ॲग्रीगेटर’ धोरणाला मान्यता देण्यात आली.
वातावरणीय बदलामुळे कधी ऊन, तर कधी पाऊस अशी स्थिती निर्माण झाली आहे. पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज बनली आहे. त्यामुळे अधिकाधिक इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करावा, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे. यादृष्टीने आता राज्यातील एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये दुचाकी (बाइक) टॅक्सी समुच्चयक ॲग्रीगेटर सेवा सुरू करण्याबाबतचे धोरण लागू करण्यात आले आहे.
इलेक्ट्रिक बाइक टॅक्सी वाहनांचे समुच्चयक धोरण ठरविण्यासाठी स्थापन केलेल्या रामनाथ झा यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केलेल्या शिफारशीनुसार हे धोरण लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे राज्यातील नागरिकांसाठी वाहतुकीचा फायदेशीर व सोयीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. या धोरणांतर्गत बाइक टॅक्सी सेवा देण्यासाठी इलेक्ट्रिक बाइक वापराव्या लागणार असून, त्या पिवळ्या रंगात रंगवलेल्या असतील. यातून मोठी रोजगारनिर्मिती होणार असून महिला चालकांनादेखील यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे.
जीपीएस, आपत्कालीन नंबर बसवणे बंधनकारक
या धोरणांतर्गत सेवा देणाऱ्या ॲग्रीगेटरच्या वाहनांना जीपीएस लावणे, संकटकालीन संपर्क सुविधा, वेग पडताळणी, चालक व प्रवासी या दोन्हींसाठी विमा संरक्षण, स्वच्छता दर्जा राखणे आदी बाबी आवश्यक करण्यात आल्या आहेत. त्यासोबतच दुचाकी चालकांची निवड करताना त्यांची पार्श्वभूमी तपासून सुरक्षेच्या सर्व निकषांची पूर्तता करणे आवश्यक करण्यात आले आहे.
Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.