माझ्या नवऱ्याने सोडलीय दारू बाई देव पावला ग..!!

रुख्मिणी उर्फ रोशन सातारकर यांनी त्यांच्या दमदार आवाजात गायलेलं हे लोकगीत लोककवी हरेंद्र जाधव यांनी लिहिले आहे आणि लोकगीतांना, लावण्यांना जबरदस्त संगीत देण्यात ज्यांचा हातखंडा होता असे बहारदार संगीतकार  विठ्ठल शिंदे यांनी या गीताला संगीत दिलेले आहे. 

१९७५ साली ध्वनिमुद्रित झालेले हे गीत त्याकाळी रेडिओ आणि ग्रामोफोनच्या गोल तबकड्यांवर ऐकायला मिळायचे. तेव्हा टेपरेकॉर्डर जवळपास अस्तित्वात नव्हता. आणि ग्रामोफोन सुद्धा सर्वसामान्यांना घेणे परवडत नसल्याने त्याकाळच्या तब्बल एक दोन पिढ्या रेडिओने जगविल्या आणि गाणी ऐकत्या केल्या असे म्हटल्यास मुळीच वावगे ठरू नये. रेडिओवर गाणी ऐकून बऱ्याच लोकांना गाण्याची तोंड ओळख झाली आणि गाणी गाण्याची सवय सुद्धा लागली. माझ्यासारखे कितीतरी रेडिओवर गाणी लागली की भरभर ती वहीत उतरवून घेत असू.. यामुळे माझा तरी लिहिण्याचा स्पीड वाढला आणि गाणी गाण्याची आवड सुद्धा वाढली..

' आनंद झाला माझ्या मनाला सोन्याचा दिस हा उगवला ग..

माझ्या नवऱ्याने सोडलीय दारू बाई देव पावला ग..!'

जशी जाळी गरगर फिरवी भवऱ्याला, तशी ती फिरवीत होती माझ्या नवऱ्याला.......

तमाशा असो अथवा लोकगीत.. मात्र, त्याकाळी समाजप्रबोधनाचे माध्यम ही क्षेत्रे आहेत याची जाणीव जाणकारांना झाल्यामुळे दारू मुळे किती घरांची वाताहत होते हे लक्षात घेऊन समाजप्रबोधनासाठी हरेंद्र जाधव यांनी हे गाणे लिहिले व ते फक्त तुफान गाजले असेच नाही तर हे गाणे ऐकून अनेकांनी दारू सोडली. अगोदर माणूस दारू पितो व नंतर दारू माणसाला पिते आणि त्याचे घरदार संसार, मुले, बाळे, बायको असे सारे रस्त्यावर येतात. घराचे घरपण राहत नाही. दारुड्यांना समाजात अजिबात मान नसतो आणि या दारूड्यांमुळे त्यांच्या घरातल्याना अनेक ठिकाणी अपमान सहन करावा लागतो. दारूमुळे काय काय दुष्परिणाम होतात आणि घरातली लहान मुले सुद्धा सतत दबावाखाली राहतात याचे अत्यंत सुंदर उदाहरण म्हणजे हे गाणे आहे. म्हणून अशा प्रकारची समाजप्रबोधन करणारी लोकगीते, तमाशागीते लोकांच्या मनावर आजही अधिराज्य गाजवीत आहेत.. आपल्यावर जबाबदारी आहे याची जाणीव घरातल्या कर्त्या पुरुषांना असणे गरजेचे आहे. घरातले मोठे जर चांगले असतील तर छोटे त्यांचा आदर्श घेतात. अशीच वेगवेगळी समाजप्रबोधनपर गीते घेऊन आता आपण नियमित वाचकांच्या सेवेला येणार आहोत..

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

40
Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.