श्री. विनोद सूर्यराव सरांची विद्यार्थ्यांप्रती तळमळ..
जी मुले इतरांपेक्षा शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या वेगळी असतात अशा मुलांसाठी डोंबिवली पूर्वेच्या कल्याण-डोंबिवली मुख्यालयाच्या बाजूला असलेल्या पी.पी. चेंबर समोर असलेल्या श्री समर्थ कृपा स्कूल फॉर स्पेशल निड चिल्ड्रेनची किलबिल विनोद सूर्यराव सरांच्या मार्गदर्शनाखाली फुलत आहे.
या शाळेत ४ वर्षाच्या मुलांपासून २५ वर्षांच्या मुलांपर्यंतरच्या मुलांना लिहिण्या वाचण्यापासून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अथक प्रयत्न केले जातात. शाळा सोमवार ते शनिवार या कालावधीत सकाळी १०.३० ते ४ या वेळेत भरते.
२०२१ साली स्थापन झालेली ही शाळा आपल्या वेगळ्यापणाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. बौद्धिक अक्षम, स्वमग्न (ऑटीझम ) मुलांची शाळा म्हणून या शाळेला ओळखतात. इथे क्लासेस आणि वैयक्तिक सेशन इथले शिक्षक अगदी जीव तोडून शिकवतात. सध्या इथे २२ विद्यार्थी आहेत. वीस वर्ष पर्यंत शिक्षणावर काम केले जाते तर २१ ते २५ वर्षाच्या मुलांच्या व्यावसायिक प्रशिक्षणावर भर दिला जातो. ज्यात संगणक प्रशिक्षण, मेणबत्ती, अगरबत्ती बनवणे, लॕमिनेशन, झेरॉक्स, पॕकिंग वर्क, पणत्या, आकाशकंदील, राखी, धूप. कापडी कागदी पिशव्या बनवणे त्याच बरोबर प्रकल्प अभ्यासक्रम मूल्यांकन तपासणी असे सर्व आहेच आणि दैनंदिन जीवनातील मुलांचे कौशल्य वाढविणे तथा संवाद कौशल्यावर भर दिला जातो. अभ्यासात लिहिणे,वाचणे, गणित, मराठीचे ज्ञान, पर्यावरण, शारीरिक शिक्षण, मनोरंजन, क्राफ्ट, चित्रकला, फनी गेम, डिजिटल लर्निंग, प्रोजेक्टरचा वापर इत्यादींच्या साहाय्याने मुलांना विकसित केले जाते.
शाळा सोशल ऍक्टिव्हिटीवर भर देते, वार्षिक स्नेहसंमेलन, क्रीडा स्पर्धा, वार्षिक सहल, वर्षातून चार पाच वेळा या मुलांना पब्लिक प्लेस मध्ये सुद्धा नेलं जातं. मुलांना जास्तीत जास्त समाजात वावरण्याचे शिक्षण दिले जाते. मुलांनी तयार केलेल्या वस्तूंचे वर्षातून २/३ वेळा स्टाॕल लावले जातात.
मुलांसाठी इथे भाग्यश्री जाधव, स्वाती विचारे, सुप्रिया देशमुख या शिक्षिका आहेत आणि सुनीता जैस्वाल या मावशी आहेत. आणि स्वतः विनोद सूर्यराव सर सुद्धा शिकवतात. त्याच बरोबर मुलांसाठी तनया नलावडे या थेरपिस्ट तर, मृदुला आठवले या सायकॉलॉजिस्ट आहेत. भविष्यात NIOS शिक्षण पुरवले जाणार आहे त्याच बरोबर लाईफ स्किल किचन ऍक्टिव्हिटी आणि मुलांचे भविष्य उज्वल करणारे अनेक प्रोजेक्ट राबविले जाणार आहेत.
सध्या ही शाळा भाड्याच्या जागेत भरत असल्याने दानशूर व्यक्तींनी हातभार लावल्यास किमान भाड्याचा प्रश्न सुटेल. विनोद सूर्यराव सर त्यांचे हितचिंतक आणि स्टाफ सह एकहाती ही लढाई लढत आहेत. त्यांचे हात आर्थिकदृष्ट्या बळकट करणे गरजेचे आहे. कारण येथील मुले बौद्धिक अक्षम आणि स्वमग्न या प्रकारात मोडत असल्याने या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मदत केल्यास हे अतिशय उत्कृष्ठ काम ठरणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : श्री. विनोद सूर्यराव. ९१५८३४६९०३ / ८१६९४५५६८८
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग..
Shabda Khadag © 2024. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.