प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मराठीचे मारक आपणच ठरत आहोत..
महाराष्ट्रात राहायचं, महाराष्ट्रात पैसे कमवायचे, महाराष्ट्रात खायचं, महाराष्ट्रात सोयी सुविधा घ्यायच्या आणि तरी मराठी भाषा मात्र येत नाही म्हणून मराठी बोलायची नाही. का असं होतंय तर मराठी माणूस आपापसात देखील मराठी असूनही मराठीत बोलत नाही. आपल्याच माणसांना आपल्या मातृभाषेत अर्थात मराठीत बोलायची लाज वाटत असेल तर आपण इतरांना बोलण्यात काहीच अर्थ नाही हो..
काही परराज्यातील मंडळी पोटापाण्यासाठी आयुष्यभर महाराष्ट्रात राहतात. मात्र, त्यांना मराठी येत नाही. हिंदी चित्रपट सृष्टी मधीलही बऱ्याचशा मंडळींना मराठी येत नाही. काही राजकारणी केवळ मतांवर डोळा ठेवून या लोकांवर मराठीचे बंधन लादत नाही. आणि काही राजकीय पक्ष महाराष्ट्रात राहणाऱ्याला मराठी यायलाच हवी अशी ठाम भूमिका मांडतात. महाराष्ट्रात राहणाऱ्याला मराठी बोलता यायलाच हवी या मताचे आम्ही सुद्धा आहोत. मराठीसाठी आणि मराठीच्या बाजूने लढणाऱ्या प्रत्येकाच्या सोबत आम्ही अगदी कायम आहोत. जर मराठी माणूस प्रत्येक दुकानात, कार्यालयात, मॉलमध्ये मराठी बोलला तर त्या लोकांना झकमारून मराठी शिकावे आणि बोलावे लागेल. मात्र, आपणच रिक्षा असो अथवा टॅक्सी असो हिंदीत बोलतो मग त्यालोकांना मराठी शिकण्याची गरजच भासत नाही. मराठी माणसाने मराठीचा अभिमान बाळगावा आणि महाराष्ट्रात मराठीतच बोलावे. ज्याला समजायचे असेल तो समजेल आणि नाही समजायचे असेल तो गेला उडत. मराठीचा अभिमान आपणच नाही बाळगला तर इतर का बाळगतील हो.. मराठी माणसा अजूनही जागा हो आणि मराठीचा झेंडा अभिमानाने फडकव. आम्ही भाषा वाद अथवा प्रांत वाद करीत नाही हेही इथे लक्षात घ्या. मात्र, इतर राज्यांत जशी तिथे त्यांची स्थानिक भाषा बोलली जाते तशी महाराष्ट्रात मराठी भाषा बोलली जावी इतकीच प्रामाणिक अपेक्षा आहे. आणि जर आपणच मराठीच्या गळ्याला नख लावले तर 'मुंबई तुमची आणि भांडी घासा आमची.' ही वेळ पुन्हा आपल्यावर आल्याशिवाय राहणार नाही..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.