विधानसभा २०२४.. महाराष्ट्र कुणाच्या हाती जाणार.. लोकशाहीच्या की हुकूमशाहीच्या..??

महाराष्ट्राच्या २८८ जागांसाठी बुधवार २० नोव्हेंबर २०२४ ची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक सुरुवातीपासूनच विविध कारणांसाठी गाजली आहे. अगदी स्पष्टच सांगायचे तर या निवडणुकीने सत्तेसाठी खेळले गेलेले अत्यंत गलिच्छ राजकारण पहिले आहे. भाऊबंदकीचे नात्यांच्या तोंडाला काळं फासण्याचे प्रयोग पहिले आहेत. तर दुसरीकडे आपली औकात नसतांना केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी समोरचा चांगला उमेदवार पाडण्यासाठी काही महाभागांनी जवळपास सर्वच ठिकाणी त्यांच्या पक्षाचे उमेदवार उभे करून भाजपाला छुपा पाठिंबा दिल्याचेही महाराष्ट्र्राच्या जनतेने पहिले आहे. अगदी आता म्हणजे संध्याकाळी आठ वाजता टीव्ही पोलवर बोलतांना काही समीक्षकांनी अशा लोकांचा जाहीर समाचार घेतला. खरे तर मीडियाने अशा प्रकारचे स्वार्थी राजकारण करणाऱ्या नेत्यांना हिरो करायला नको होते. हे नेते फक्त बोलबच्चन आहेत हे मीडियाला ठाऊक असूनही अशा लोकांना सतत प्रकाशात ठेवणे हा पत्रकारितेचा अपमान आहे असे आम्हाला वाटते. राजकारणात सत्तेसाठी हेवेदावे चालतात, अपक्षांना फोडलं जातं, पक्षांतरं सुद्धा होतात पण मीडियाने डोक्यावर घेतलेले पाचही आमदार न निवडून आणू शकणारे काही नेते हे विषवल्ली आहेत. महाराष्ट्र आपल्याच बापाचा आणि आपल्याला राजकारणातलं आणि सगळ्यातलं सगळं कळतं अशा गुर्मीत सतत उद्धट बोलणाऱ्या या नेत्यांना  मीडियाने किमान आतातरी स्वतःच्या डोक्यावरून खाली उतरवावे असे वाटते. 

या मतदानात नेहमी पेक्षा जास्तच गोंधळ झाला आहे..

बीड मध्ये EVM मशीन फोडली तर नागपुरात EVM मशीन घेऊन जाणाऱ्या गाडीला फोडले. कोल्हापुरात मशालीचे बटन दाबल्यावर धनुष्याला मत जाते असा आरोप करण्यात आले. पाथर्डीत आमदार मोनिका राजळेंच्या गादीवर दगड फेक झाली. आमदार सुहास कांदे यांनी समीर भूबाळांना जीवे मारण्याची धमकी दिली. आमदार रमेश बोरनारे यांच्या गादीवर सुद्धा दगडफेक झाली. धुळ्यात बोगस मतदान झाल्याचा आरोप झाला. कोल्हापुरात लाटकर आणि क्षीरसागर यांच्या गटार राडा झाला. कोरेगावात शरद पवार गट आणि शिंदे सेनेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. राष्ट्रवादी शरद पवारांच्या युट्युबवर फेमस असणाऱ्या नितेश कारळे मास्तरांना मारहाण करण्यात आली. कोपरखैरणेत स्वराज्य पक्षाच्या अंकुश कदम आणि भाजपच्या माजी नगरसेवकाच्या मुलात तुफान हाणामारी झाली. पुणे इंदापूरात दत्ता भरणे यांचा राडा झाला. मुंबईच्या सायन-कोळीवाड्यात आमदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. संजय निरुपम यांनी उबाठाच्या मुस्लिम कार्यकर्त्यांशी हुज्जत घातली. उल्हासनगरच्या कुमार आयलानी यांच्यावर पैसे वाटत असल्याचा आरोप झाला. धर्माबाद तालुक्यातील मंगनाळी या ठिकाणी कंट्रोल युनिट बिघडल्याने रात्री सात नंतरही मतदान सुरु होते.

महाराष्ट्र राज्य लोकशाही मानणाऱ्यांच्या हाती जाणार की हुकूमशाही आणू पाहणाऱ्यांच्या हाती जाणार हे शनिवार २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणीतून अवघ्या देशाला कळेल. त्यानंतरही काही युत्या आघाड्या होतील. अपक्षांना फोडले जाईल आणि राजकारणात धुळवड खेळली जाईल. मात्र, स्वतःच्या स्वार्थासाठी मुद्दाम इतर निवडून येणारे चांगले उमेदवार पाडणाऱ्या  लोकांना महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही. फक्त मीडियाने या बेडक्यांचे बैल बनवू नयेत एवढीच प्रामाणिक अपेक्षा आहे. यावेळी राज्यात ६०.३१ टक्के मतदान झाले आहे. ठाण्यात सर्वात कमी मतदान झाले आहे. लोकांचा दलबदलू आणि थापाड्या नेत्यांवरचा विश्वास उडाल्याचे निदर्शनास येत आहे. एकमेकांची नाहक डोकी फोडणाऱ्या कार्यकर्त्यांचे नेहमीप्रमाणेच आश्चर्य वाटले. देश छुप्या हुकूमशाहीकडे निघाला आहे याचा मात्र खेद होत आहे..

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

8
Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2024. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.