खरं बोललेलं सख्ख्या आईला सुद्धा पटत नाही म्हणतात..

खरं बोललेलं सख्ख्या आईला सुद्धा पटत नाही म्हणतात..

हल्ली खरं बोलणं हा जणू गुन्हा झाला आहे. आपण एखाद्याला अगदी मैत्रीत्वाने आणि साध्या शब्दांत त्याची उणीव दाखवून देण्याचा प्रयत्न केल्यास ती समोरची व्यक्ती आपल्यावर नाराज होते आणि आपल्याशी बोलणे सोडून देते. मी हे अनुभवलेले आहे..

आपली चूक असेल तर ती मान्य करण्याचे आणि सुधारण्याचे मनाचे मोठेपण फार कमी लोकांमध्ये असते. खरं बोलणाऱ्याला टीकेचे धनी व्हावे लागते. जे तुम्हाला हरभऱ्याच्या झाडावर चढवतात, तुमची खोटी स्तुती करतात तेच लोक तुम्हाला आवडतात. आणि खरे बोलणारे तुमचे दुश्मन ठरतात. ज्यांना ऐकूनच घ्यायचे नसते अथवा ज्यांची मानसिक आणि बौद्धिक जडणघडण अत्यंत खालच्या पातळीची असते अशा लोकांना समजावीत बसण्याची  काही गरज नाही. भल्याची दुनिया राहिली नाही राव. हल्ली कुणी मरत असेल तर त्याला आणखी मारा अशी दुनियेची रीत आहे. मेहनती आणि प्रामाणिक माणसांना आयुष्यात खूप समस्या आणि दुःख असतात. तर छछोर आणि याच्या त्याच्या खांद्यावरून सतत स्वतःचा उदोउदो करवून घेणाऱ्या, सतत तोंड रंगवून खोटं खोटं वावरणाऱ्या माणसांना या दुनियेत किंमत मिळते. आणि प्रामाणिक माणसे मात्र मुख्य प्रवाहापासून सतत दूर फेकली जातात. कारण त्यांना स्वतःची लाल करता येत नाही. माडगूळकरांनी अशा माणसांसाठी 'लबाड जोडिती इमले माड्या गुणवंतांना मात्र झोपड्या.' असे म्हटले आहे. तर, जगाने ओवाळून टाकलेल्या काही स्त्रियांसाठी 'पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा वेश्येला मणिहार, अजब तुझे सरकार उद्धवा अजब तुझे सरकार.' असे म्हटले आहे. विजय तेंडुलकरांच्या सखाराम बाईन्डर मध्ये सखाराम म्हणतो की या दुनियेत वेश्ये इतकं प्रामाणिक प्रेम कुणीच करू शकत नाही.. खूप यथार्थ आणि वैश्विक वर्णन आहे हे. कारण हल्ली गरज सरली की तू कोण आणि मी कोण असे म्हणणारे आणि म्हणणाऱ्याच सगळीकडे पहायला मिळत आहे.

आपल्या घटनेने आपल्याला बोलण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे. आपण जोवर समोरच्याच्या फायद्याचे बोलतो तोवर आपण चांगले असतो. पण, जेव्हा आपण खरे बोलून समोरच्याच्या वर्मावर बोट ठेवतो तेव्हा आपण वाईट ठरतो. आपण जे बोलतोय ते खरे की खोटे हे आत्मपरीक्षण करून किमान ऐकून घेण्याची देखील काही लोकांची पात्रता नसते. मी बोलतो अथवा मी बोलते तेच अंतिम सत्य असे समजणारे दुनियेचे भेकड असतात. त्यांना स्वतःच्या मतापेक्षा आणि स्वतःच्या मनापेक्षा इतरांना काय वाटेल याचीच जास्त भीती वाटत असते. कारण हे इतर त्यांचे स्तुतिपाठक असतात. अशा स्तुतिपाठकांना दुखावले तर यांची दुकाने बंद पडतील अशीही  यांना सतत भीती वाटत असते. कधीतरी खरं ऐकून घेण्याची सुद्धा मनाची तयारी ठेवा हो.. पण नाही कारण अशा व्यक्ती प्रचंड इगो पाळलेल्या असतात. काही मंडळी जुनेच दळण रोज नव्याने दळत बसतात. नेहमी स्वतःच गाजण्यापेक्षा कधीतरी समजोपयोगी सुद्धा कामे करा हो.. इगो असलेली माणसं कधीच कुणाची होऊ शकत नाहीत. म्हणून या लोकांना फाट्यावर मारा आणि पुढे निघा. ज्यांची चांगल्या माणसांसोबत राहण्याची लायकी नाही त्यांच्यासाठी आपण आपला वेळ वाया घालवायचा नसतो हो.. आपल्या जुन्या जाणत्या लोकांनी म्हणूनच म्हणून ठेवलंय ना की, खरं बोललेलं सख्ख्या आईला सुद्धा पटत नाही तिथे या काल परवा तुमच्या आयुष्यात येऊन  गेलेल्यांना काय पटणार आहे म्हणा..

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

136
Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.