सन्माननीय अपवाद वगळता.. पूर्वी आई होती.. काळ बदलत गेला आणि आईची मम्मी झाली.. बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि तो स्वीकारायलाच हवा त्यात अजिबात दुमत नाही. मात्र, मुलीचं लग्न झालं की त्यांच्या आयांचा प्रमाणा पेक्षा जास्त मुलीच्या संसारातील हस्तक्षेप मुलीचं घर मोडण्यास कारणीभूत ठरतो हे सगळ्यांना माहित असूनही आपल्याला माहित नाही असेच बहुतांश लोक दाखवतात. महिला म्हटली की ती कधी चुकणारच नाही जणू अशीच मानसिक आणि सामाजिक धारणा असल्याने आजही नव्वद टक्के वेळा पुरुषांनाच दोषी समजलं जातं.. आपला नवरा तीस पस्तीस वर्षांची सर्व्हिस करून रिटायर्ड झाल्यावर तुम्ही हक्काचं घर घेता आणि मुलीला पहायला आलेल्या मुलाला जो नुकताच कामाला लागलाय त्याच्याकडे तुझं स्वतःचं घर आहे का अशी अपेक्षा करायची. घरी वडापाव खायची मुश्किल आणि समोरच्याकडे बर्गर खाऊ घालेल का अशी अपेक्षा करायची. काहीही अवास्तव अपेक्षा ठेवायच्या त्यात. सासू सासरे नकोत, नणंद, दीर नकोत अशा काहीही अपेक्षा ठेवायच्या. मुलगा एकटाच हवा, श्रीमंत हवा इत्यादी इत्यादी.. अरे समोरच्यांकडून अपेक्षा ठेवतांना आपण त्या पात्रतेचे आहोत का याचा ही विचार व्हायला नको का. आयांच्या अवास्तव हस्तक्षेपाने अनेक मुली देशोधडीला लागल्यात.
स्वतःच्या मुलीला वर्षभराच्या आत जावयाच्या आई बापा पासून वेगळं काढायचं आणि त्यात धन्यता मानायची. अशा अनेक आया माझ्या परिचयाच्या आहेत. तेच जर यांच्या सुनेने यांच्या मुलाला यांच्यापासून तोडलं तर घर फुटण्याचं दुःख काय असतं हे यांना कळेल. मुलगा दूर गावी कामाला आहे किंवा सासरच्या आपल्या मुलीच्या जीवावर उठलेत असे काही असेल तर मग वेगळी गोष्ट आहे. मुलीला सासरी खूप जाच आहे असे असल्यास सुद्धा मुलीची बाजू घेल्यास ते वावगे नाही. मात्र, सर्व आलबेल असतांना मुलीचे बारा वाजवायचे हा हल्लीच्या काही आयांचा धंदा झाला आहे. मुली पेक्षा आईच्याच अपेक्षा जास्त असतात. नवरा मुलीला करायचा आहे की तिच्या आईला हा प्रश्न पडावा इतका जास्त काही आया हस्तक्षेप करीत असतात. टापटीप राहणं, मेकअप करणं अजिबात गुन्हा नाही. मात्र, आपलं वय काय आणि आपण डोक्याचं सोडून जर कंबरेला गुंडाळत असू तर त्याला अर्थ नाही हो. आज जागेचा, दूर गावी असलेल्या नोकरीचा प्रश्न असल्याने एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत चालली आहे. पण त्यामुळे नाती सुद्धा एकमेकांना पारखी होत चालली आहेत. कुटुंबाचा आधार आणि कणा म्हणून हे काम आई वडिलांनी करायचं असतं. काही आई वडील हे काम चोखपणे करतात देखील. मात्र, काही आया स्वतःच्या माहेरचं एकत्र कुटुंब आणि आर्थिक परिस्थिती विसरून जावयाकडून अवास्तव अपेक्षा करतात. सन्माननीय अपवाद वगळता दुर्दैवाने असे म्हणावेसे वाटते की आज आधुनिक काळातल्या मुलींपेक्षा त्यांच्या ओढूनताणून आधुनिक झाल्याचा आव आणणाऱ्या मम्मीलाच खऱ्या अर्थाने प्रबोधनाची गरज आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.