सध्या निवडणुकांवर डोळा ठेवून अनेक तथाकथित नेते कावळ्यासारखे एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उडत आहे. काही अंशी त्यांचंही बरोबर आहे. कारण सत्तेसाठी सर्व काही असतं. सत्ता नसेल तर यांना कुत्रं ही विचारीत नाही.
आणि म्हणून काहीही झालं, कितीही पैसा खर्च करावा लागला तरी सत्ता आणि खुर्ची मिळवायचीच याची स्पर्धा लागली आहे. खरं तर काही अपवाद वगळता इथे हमाम में सर्वच नंगे आहेत.. एकाला झाका आणि दुसऱ्याला काढा अशी सध्याची स्थिती आहे. खरं तर जनतेने पक्ष न बघता योग्य माणूस बघून मतदान करावे. काही नेत्यांकडे, मंत्र्यांकडे यांच्या शंभर पिढ्या बसून खातील इतका पैसा आहे. मात्र, सर्वसामान्य जनतेला अन्न, वस्त्र, निवारा या गोष्टी महत्वाच्या वाटतात. या गोष्टी जे लोक या सामान्यांना मिळवून देतील तेच लोक महत्वाचे. दुर्दैवाने या महत्वाच्या गोष्टीही काही जणांना मिळत नाही.
निवडणूका आल्या की घोषणांचा पाऊस पडतो, पक्षांतरं होतात आणि काही मतदार शे - पाचशे रुपयांत स्वतःचं मत विकून पाच वर्षांसाठी कुणाचेही गुलाम होतात. बदल गरजेचा आहे. नवीन चेहरे पुढे यायला हवेत, ऐंशी टक्के तिकिटं यांच्याच नातेवाईकांना, मर्जीतल्यांना आणि घरातल्यांना दिली जातात आणि सामान्य कार्यकर्ता मात्र आयुष्यभर चटईच अंथरत राहतो.. आज एकही राजकीय पक्ष एकहाती निवडून येऊ शकत नाही हे आपल्याला मान्य करावेच लागेल. कुणा ना कुणाशी हातमिळवणी करूनच सत्ता पदरात पाडून घेता येते. देश प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे लोकशाहीकडून हुकूमशाहीकडे चालला आहे आणि हे देशाला आणि सर्वसामान्यांना घातक ठरू शकते. घटना वाचली तर देश शाबूत राहील असे आमचे स्पष्ट मत आहे. जग झपाट्याने विस्तारत असतांना जातीपातीचे राजकारण न करता अथवा जातीपातींच्या पलीकडे पाहून मानवतेचा विचार करून मानवतेचाच विकास करावा असे आम्हाला स्पष्टपणे सांगावेसे वाटते.
पक्षांतर करणे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न जरी असला तरी सकाळी एका पक्षात, दुपारी दुसऱ्या पक्षाच्या मांडीला मांडी लावून बसायचे आणि संध्याकाळी तिसऱ्या पक्षात स्वतःच्या स्वार्थासाठी प्रवेश करायचा हे सध्या चालले आहे. हे लोक जनतेला मूर्ख समजतात. जनतेने अशा दल बदलू लोकांना आणि प्रामाणिकांना डावलून या दलबदलूंना पुन्हा पवित्र करून घेणाऱ्यांचे काय करावे हा अर्थात मतदारांचा प्रश्न आहे. ये पब्लिक है सब जाणती है.. शेवटी अगदी थोडक्यात सांगायचं तर इथे सर्व काही फक्त आणि फक्त सत्तेसाठीच चालतं..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग..
Shabda Khadag © 2024. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.