माणसं गरीब होती पण गांव श्रीमंत होतं.. हरवत चाललेलं गांव.. - प्रा. दिपक जाधव..

आज गांव हरवत चाललंय नव्हे नव्हे हरवलंय.. नागरीकरणाच्या झपाट्यात आज जात्यावरची गाणी गाणारी आजी आणि ते जातं सुद्धा हरवलंय, आणि वासुदेव आला हो वासुदेव आला म्हणणारा वासुदेव हरवलाय, आज हरवलाय नंदी बैलवाला, भांड्यांना कल्हई करून देणारा कल्हईवाला.. विकली जातेय शेती आणि झपाट्याने गांव शहर बनू लागलंय. बदल अपरिहार्य आहे बदल व्हायलाच हवा. पण, हा बदल होतांना माणूस आणि त्याची माणुसकी हरवत चालली आहे. आजही तुरळक गावांमध्ये चावडीच्या पारावर बसलेली काही जुनी जाणती माणसं दिसतात आणि धूर उडवत जाणारी एसटी सुद्धा दिसते. या बदलात बारा बलुतेदार रसातळाला गेले असे म्हटल्यास वावगे ठरू नये. 

शहराचे अंधानुकरण करतांना गांव स्वतःचे गावपण विसरले आहे हो. माध्यमं आणि चित्रपट, टीव्ही मालिकेत जे दाखवलं जातं त्याला पूर्ण खरं समजून तसंच वागण्याच्या प्रयत्नात हातचं निसटून चाललंय.. पहाटे आरवणारं कोंबडं आणि नदीवर पाणी भरायला आणि गुरांना पाणी पाजायला जाणारे गुराखी उद्या मोडीत निघाले तर कुणाला आश्चर्य वाटायला नको.. मी नेहमीच माझ्या लेखांत आणि व्याख्यानांत हे सांगत आलोय की ज्याची  गावी परिस्थिती चांगली आहे त्याने उगीचच शहराच्या नादी लागून स्वतःचे पाच दहा वर्ष आयुष्य कमी करू नये. शहरात माणसांचे, गाड्यांच्या धुराचे आणि माणुसकीचे प्रदूषण  झालेले असतांना प्रामाणिक माणसाची इथे खूप ओढाताण होते हो. 

स्वयंपूर्ण खेडी बनवून खेड्यात बऱ्यापैकी सुधारणा केल्यास लोक आपापल्या गावी राहून स्वतःचा आणि देशाचाही विकास करतील. पण कुणी काय करावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असल्याने गावचा पाटील शहरात खूपदा कुणाच्या खिजगणतीत नसेल तर त्याला तोच जबाबदार असतो. अगदी गरज नसतांनाही काही लोक शहरात येऊन स्वतःची परवड करून घेतात. तर, काही लोकांना गावी हाताला काही कामच नसल्याने उपासमार होते म्हणून हे लोक शहरात  येतात. पोटापाण्यासाठी शहरात येणाऱ्या लोकांना पर्याय नसल्याने आपण त्यांना पाठिंबा द्यायलाच हवा..

आता जुनी गावे फक्त मराठी जुन्या चित्रपटातच पहायला मिळतात. सर्व काही फास्टच्या नादात आपण पुढे गेलो तरी आठवणी मात्र मागेच घडून गेलेल्या काळात अडकून पडतात आणि मग तुमचा पिझ्झा बर्गर हा पाट्यावरच्या हिरव्या, लाल मिरचीच्या ठेचा आणि भाकरीपुढे अगदी बेचव लागतो.. 

माझे म्हणणे काही लोकांना पटणार, रुचणार नाही. पण, हरकत नाही आपण त्यांच्या मताचा आदर करूया.. मात्र गांव जपायलाच हवे आणि तेथील माणसं आणि त्यांचे व्यवसायही जपायलाच हवेत. 'त्या तिथे पलीकडे तिकडे माझिया प्रियेचे झोपडे' हे गीत म्हणायला आज झोपडेच उरणार नाही आणि मग सगळं अगदी चकचकीत होईल.. कधीतरी मळलेल्या वाटेवरून चालण्यात खूप मजा असते आणि तीच मजा आज गांवच हरवत चालल्याने हरवत चालली आहे..

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग..

90
Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2024. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.