शिशिराने निरोप घेतलाय पानगळतीतून सर्जनाची बीजं रुजती करुन ....थंडीची शिरशरी संपून उष्म्याची काहिली सुरू झालीय ...हा ऋतूपालट चराचरातुन चैतन्य विखरून कुसुमाकराच्या आगमनाची वर्दी घेऊन आलाय ...विविध रंगांनी नटलेला निसर्ग , नव्याने होऊ घातलेल्या सर्जनाचं लालस -तांबूस ,पोपटी तृणांकुरांचं राना - कुरणांतून नव्याने जाणवायला लागलेलं कोवळंशार मखमली अस्तित्व , आणि चैत्र पालवीचा आविष्कार म्हणजेच माणसाच्या आयुष्यातल्या सगळ्या काळज्यांचं होळीच्या अग्नीत झालेलं दहन !!!
धकाधकीच्या आयुष्यात सगळ्या जुन्या, चिंता , काळज्या , कटकटी होळीत संपवून नवीन आयुष्यात , हिरवळीची आस प्रत्येकजण धरून असतोच. त्यातूनच अनेकवेळा नवीन उमेद तयार होत राहते, नवीन सकारात्मक ऊर्जा , सळसळता उत्साह धमन्यांमधून वाहतो . तसाच वाहत राहो . प्रत्येकाला हा विचार मनात आणि आजूबाजूच्या वातावरणात पेरता आला तर तशीच स्पंदनं तयार होतील आणि आप-पर आस्था वाढू लागेल . नकारात्मक विचार नष्ट होऊन सकारात्मक विचार वाढीस लागतील.
शांत , समाधानी , तृप्त ,- निःशंक, अतूट प्रेमाने भरलेलं , मनात कोणाच्याहीविषयी राग नसलेलं, निसर्गाची सगळीच रूपे आपल्यात विशिष्ठ प्रकारे सामावून घेण्यासाठी, निसर्गाशी तद्रूप व्हायला तयार असलेलं - सगळ्या वातावरणाशी एकरूप झालेलं - त्यातून फक्त आणि फक्त सृजनशील विचार करू शकणारं, कोणत्याही परिस्थितीत स्थीर राहण्याची ईच्छा असलेलं - त्यासाठी सगळ्या शक्य असलेल्या गोष्टी करण्याची तयारी असलेलं, प्रेमळ , प्रेमासाठी आसुसलेलं , सात्विक - वाईट विचार न करणारं , सगळे सुखात , आनंदात , मजेत राहावे याची प्रार्थना करणारं, दुसऱ्याच्या आनंदात आनंदी होणारं, दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होणारं, विचलित होणारं, आकाशातले ढगांचे रंग आणि आकार बघून , शेतातील हिरव्याकंच रंगाने भारावून जाणारं, पहिल्या पावसाचा थेंब अंगावर पडताच हर्षोल्हासित होणारं, मोरासारखं थुई थुई नाचायला तयार असलेलं, पावसात स्वतःला जोरदार भिजवून आल्यावर, कडाडून ओरडणारी आई दिसताच तिची बोलणी खायला तयार असलेलं आणि मग तिच्याच हातची गरमागरम कॉफी पिताना मात्र जवळच्या कोणाला तरी खूप आतून मिस करणारं , सख्याच्या मिठीत विरघळून जायला तयार असलेलं , आयुष्यातल्या सगळ्या सुखद आणि दुःखद आठवणीही निर्भयपणे, त्रयस्थपणे पाहायला शिकलेलं, स्वतःच्याच चुका शांतपणे पाहायला शिकलेलं, कधितरी वज्राहूनही कठीण होणारं, दुसऱ्याला घायाळ करणारं, स्वतःही घायाळ होणारं, हळवं होणारं अश्या सगळ्या रंगात नाहून निघणारं, समुद्रासारखं खोल आणि आभाळासारखं विशाल , मनापासून माफी मागणारं आणि माफ करणारं , पिसासारखं हलकं होण्यासाठी, प्रचंड वाट पाहत बसणारं, आणि सगळ्या जगाचं ओझं आपल्या खांद्यावर असल्याप्रमाणे , मणभर ओझ्याखाली दबून जाणारं अस मन प्रत्येकाकडे असावं .
जाणिवेच्या पलीकडे ही एक जग असते . विविध प्रकारच्या रंगांचे, भावनांचे ,आविष्कार नजरेत येतातच . काही वेळा हव्या त्या मनोहारी रंगात तर कधी अगदीच नको त्या गर्द रंगछटेत . तसाच विचारांचा प्रभाव ही काम करतो .गूढ , विचार वलय , विचारांची जळमटे, कोळीष्टकं विणली जातात . एकमेकांना समजून न घेता कधीतरी मनं नकळतपणे दुखावली जातात ,कधी मुद्दामच कारणाने , घाईत निर्णय घेण्याने दुखवतो आपण एकमेकांना आणि मग मोहाच्या काही धाग्यांनी बांधलेही जातो आपण . काही दुखावतात , काही दुखवुन घेतात , पण हे सगळंच डोक्यातून निघालेल्या विचार लहरींचा पसारा आवरणं खरच शक्य असते ? का अशक्य नसतं ? आणि मग असं वाटतं की हेच तर जमायला पाहीजे . नाही का ?
मनस्वी, अंतर्मनात , अशांतता पसरली असताना , हुरहूर दाटून येत असताना खोल मनात डोकावताना असे अनेक विचार येताच असतात . पण एखाद्या व्यक्तीच्या असण्याने किंवा आसपास वावराने आपल्याला शांत वाटत असेल , एकमेकांना सांभाळून घेतलं जातं असेल , मनावर हलके का होईना पण उमटलेल्या ओरखड्यांची तीव्रता कमी वाटत असेल तर तुम्ही नक्कीच कोणत्या तरी सकारात्मक विचारांच्या छायेत वावरत असाल असं वाटतं.
निरोपाच्या वाटेवरून जाताना , मौनाच्या वादळवाटा तयार न होता , अर्थहीन संवेदना , न करता सकारात्मक विचारधारेच्या प्रवाहीपणाने मनातला पाडवा साजरा करता येणं यासारखं सुख नाही . त्याचं महत्व प्रत्येकाला समजते . सत्शील मनाचा पाडवा आनंददायी होण्यासाठी हव्या असणाऱ्या मनाला खालील गोष्टीच्या विचाराधीन असणं गरजेचं आहेत असं वाटतं मला . आपलं मन त्यासाठी शांत , समाधानी , तृप्त ,- निर्विकल्प, अतूट प्रेमाने भरलेलं , मनात कोणाच्याहीविषयी राग नसलेलं, निसर्गाची सगळीच रूपे आपल्यात विशिष्ठ प्रकारे सामावून घेण्यासाठी निसर्गाशी तद्रूप व्हायला तयार असलेलं - सगळ्या वातावरणाशी समरूप साधलेलं आणि यातून केवळ शुभ विचार करू शकणारं!!
कित्येकदा , ऋणानुबंध जपताना माणसांना माणसांशी जोडण्याच्या प्रयत्न करत असताना काही गोष्टी वजा करत जावं लागतं , काही गोष्टी वजा होत राहतात आपल्या इच्छेविरुद्ध, पण त्या मान्य करून पुढे जावच लागतं . पानगळ बघितल्याशिवाय नवीन फुलणाऱ्या पालवीचं महत्व कळत नाही . वाईट वाटलं तरी संक्रमण प्रकिया बघावी लागतेच . तसेच विचारांचही असतं . उन्हाची तिरीप कोवळी असताना आवडते , तीव्र झाली की नको होते पण त्या संक्रमणाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला तरच सावलीत उभं राहावं वाटतं . तसच आयुष्य ही विविध छटा दाखवत राहतं , त्या निर्लेप पणे पाहता यायला पाहिजेत. आयुष्यातले क्षण हातातून निसटत जातानाही कधीतरी स्तब्धपणे बघत राहावं लागतच की .पानगळी पासून नवीन मोहरा पर्यंतच्या प्रवास पाहणं हे ही आनंद दायक असतं . फक्त त्याकडे बघण्याचा नजरिया बदलला पाहीजे .
जुन्या जखमा कवटाळून त्यांच्याकडे वारंवार बघत राहणं टाळता यायला लागलं , ओलाव्याचे क्षण जपता येऊ लागले की मोहोर आपोआप आवडायला लागतो, तसेच जुन्या विचारांकडे , अलिप्तता येऊन बघता येऊ लागलं की नवीन विचार आवडायला लागतात, पालवी ही मग आवडायला लागते .
वयाचा विचार न करता , लहानपणी सारखं चांगुलपणाच्या कुशीत अलगद शिरत यायला हवं , स्वतःच्या स्वत्वाला बाजूला सारून . मनमोकळेपणी .जबाबदाऱ्यांचा विसर पडायला हवा कधीतरी . हे सगळं शक्य तेव्हाच होतं जेव्हा आपल्या शेजारी नसेल कोणी , तरी आपल्या सोबत आहे कोणीतरी आपल्यावर जीवापाड प्रेम करणारं याची खात्री असेल तेव्हा .
तर अश्या पडव्याची सुरुवात अशक्य नसते कधीच. आयुष्याची नवी सुरुवात करताना ..कोणत्याही वयात , कोणत्याही दिवशी पाडवा साजरा करता येतो मग..
- मृण्मयी नारद.. (पुणे)
Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.