जागतिक कविता दिनाच्या माझ्या सर्व कवी कवियत्री मित्र, मैत्रिणींना हार्दिक शुभेछया..
कधीकधी भाव भावनांचे ढग मनाच्या आभाळाला धडक देतात आणि बरसतात शब्दसरी कागदावर. आनंद आणि दुःख व्यक्त करण्याचे हक्काचे ठिकाण म्हणजे कविता.. आसुसलेल्या मनाला मायेची उब देणारी सावली म्हणजे कविता. वेदनेला फुंकर घालण्याचे हक्काचे ठिकाण म्हणजे कविता. एखाद्यावर शाब्दिक रागाचे फटकारे ओढणारा चाबूक म्हणजे कविता. कधी सरळ, कधी तिरकं, कधी व्यंग तर कधी दीर्घ आणि रोखठोक व्यक्त होण्याचे ठिकाण म्हणजे कविता.. कविता जगता यायला हवी. ज्याला अवीट गोडीची कविता जगता येते त्याचे आयुष्य रंगबिरंगी फुलपाखरू होते. खरंतर आयुष्य म्हणजे अडीअडचणींनी भरलेला कुंभ आहे. त्यात एखादी ओंजळ सुखाची असते ती मात्र आपल्याला शोधता यायला हवी. आणि भेटलीच तर तिचे प्राशन सुद्धा करता यायला हवे..
माझं म्हणाल तर मी शीघ्र कवी आहे आणि तिरकं लिहिणं ही माझी खासियत आहे. आजवर आपल्या शब्द खड्ग वृत्तपत्राच्या माध्यमातून महाराष्ट्रभरात आपण काव्योत्सव घेतलेले आहेत आणि घेत सुद्धा आहोत. आपण अनेक नवीन लोकांना आपल्या मंचावर कविता वाचण्याची पहिल्यांदा संधी उपलब्ध करून दिलेली आहे. आणि कवी, लेखक, दिग्दर्शक, संपादक तथा समाजकारणी म्हणून मला याचा खूप अभिमान आहे. अनेकांना आपण कौतुकाची थाप म्हणून सतत पुरस्कार देत असतो. आणि हल्ली जसे पुरस्कार पैसे घेऊन वाटले जातात तसं आपण मुळीच आणि कधीच करीत नाही. आपण योग्य माणसांना आपल्या शब्द खड्गच्या वतीने स्वखर्चाने पुरस्कार देतो. कविता जगली पाहिजे कारण कविता करणारे काही अपवाद वगळला तर फार हळव्या मनाचे असतात. आणि अशी हळव्या मनाची माणसं आणि त्यांची कविता जगणं काळाची गरज आहे.
" रोज ती सखी साजणी माझ्या सोबत आहे.
माझ्या श्वासाला तिचा सहवास आहे.
माझं सर्वस्व व्यापून ती आभाळ झाली आहे.
जगण्याच्या वाळवंटात ती पाऊस झाली आहे.
गद्दार होऊन न पाळता ती माझी वीज झाली आहे.
दुसरी तिसरी कुणी नसून ती माझी कविता आहे.."
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.