दीक्षाभूमी, नागपूर येथील धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा
अधिकृत नाव धम्मचक्र प्रवर्तन दिन
इतर नावे- धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन
साजरा करणारे- बौद्ध
प्रकार- धार्मिक
उत्सव साजरा - १ दिवस
सुरुवात - अशोक विजयादशमी
दिनांक : १४ ऑक्टोबर किंवा अशोक विजयादशमी रोजी..
वारंवारता - वार्षिक
धम्मचक्र प्रवर्तन दिन किंवा धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन हा भारतात साजरा केला जाणारा एक प्रमुख बौद्ध सण आहे. बौद्ध धर्मीयांद्वारे हा उत्सव दरवर्षी अशोक विजयादशमी आणि/किंवा १४ ऑक्टोबर रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथे तसेच स्थानिक बौद्ध स्थळांवर साजरा केला जातो. महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागातील लक्षावधी बौद्ध अनुयायी धम्मचक्र प्रवर्तनदिनी नागपूरला येतात. ह्या उत्सवाची पार्श्वभूमी एक बौद्ध धर्मांतरण सोहळा आहे, अशोक विजयादशमीला १४ ऑक्टोबर १९५६ रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसोबत नवयान बौद्ध धर्मात प्रवेश केला आहे. भारतभूमीत जवळपास लुप्त झालेल्या बौद्ध धम्माचे चक्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गतिमान करत "धम्मचक्र प्रवर्तन" केले; तेव्हापासून हा दिवस "धम्मचक्र प्रवर्तन दिन" म्हणून साजरा केला जातो. तथापि, या सणाला "धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन" असेही म्हणले जाते.[१]
पार्श्वभूमी :
इ.स.पू. तिसऱ्या शतकात ज्या दिवशी सम्राट अशोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती, तो दिवस बौद्ध इतिहासात "अशोक विजयादशमी" म्हणून साजरा केला जातो. अशोकाने केलेली ही मोठी धम्मक्रांती होती आणि त्यामुळे आंबेडकरांनी अशोक विजयादशमीच्या दिवशी धर्मांतर सोहळा करण्याचे ठरवले व १४ ऑक्टोबर इ.स. १९५६ रोजी नागपूरमध्ये आपल्या ५,००,००० अनुयायांसोबत बौद्ध धर्म स्वीकारला. ती धम्मभूमी सध्या दीक्षाभूमी नावाने ओळखली जाते.[२] आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारून भारतातून लुप्त झालेल्या बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन केले.
Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.